नागपूर : पारशिवनी पंचायत समितीमध्ये गाजत असलेल्या कोट्यवधीच्या पेन्शन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी पारशिवनी पं.स.च्या शिक्षण विभागातील निलंबित कनिष्ठ लिपिक सरिता नेवारे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा घोटाळा एक कोटीहून अधिक रकमेचा असल्याने याचा तपास ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे.
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन सुरू होती. सेवानिवृत्तांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासाठी फॅमिली पेन्शन सुरू असते; परंतु या पेन्शनबाबत काही नियम आहेत. हे सर्व असतानाच नेवारे यांनी पारशिवनी पं.स.च्या शिक्षण विभागात सेवानिवृत्तांच्या पेन्शनचे टेबल हाताळताना त्यांनी मृत व्यक्तींची पेन्शन नियमानुसार बंद न करता त्याऐवजी १७ बनावट नावांवर महिन्याकाठी ५ लाख याप्रमाणे सुमारे १ कोटी ८६ लाख ५७ हजार १२७ रुपये हे स्वत:सह नातेवाईक, मित्र, ओळखीची व्यक्ती यांच्या बँक खात्यावर वळती करून शासनाची फसवणूक केली.
ही सर्व १७ बोगस बँक खाती गोठविण्यात आली. या खात्यांचे स्टेटमेंट बँकेकडून मागविले. त्यामध्ये समितीने गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये केलेल्या चौकशीनुसार आजवर नेवारे ह्यांनी शासनाची १.८६ लाखांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. त्यामुळे गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी नेवारेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण ५० लाखांहून अधिकच्या रकमेचे असल्याने आता या प्रकरणाचा तपास हा ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
१७ बोगस बँक खातेधारक अडकण्याची शक्यता
नेवारे यांच्याकडून ज्या १७ बोगस खातेदारांच्या बँक खात्यावर ही पेन्शनची रक्कम वळती करण्यात येत होती. त्यामध्ये तिच्या स्वत:सह तिच्या ओळखीतील व्यक्ती, नातेवाईक, मित्र असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यांतील काही खातेदार हे रामटेक, मनसर, कामठी, पारशिवनी आणि नागपुरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. आता पोलिसांची या खातेदारांवरही नजर राहणार असून, प्रसंगी त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.