नागपूर : देशभरातील समाजमन पेटविणाऱ्या कोलकाता येथील घटनेपाठोपाठ आता महाराराष्ट्रातील बदलापूरमध्येही निरागस चिमुकल्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे समाजमनाच्या भावनांचा उद्रेक होत असल्याचे पाहुन या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि दोन्ही प्रकरणातील हिंस्त्र आरोपींना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी दोन तेजतर्रार महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोलकाता प्रकरणाची चाैकशी बहुचर्चित आयपीएस सीमा पाहुजा करणार असून, बदलापूरच्या प्रकरणाचा तपास आयपीएस डॉ. आरती सिंग करणार आहेत. 'शेरणी' म्हणून तपास यंत्रणांमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांची ओळख आहे.
कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील लेडी डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणाने देशभर संतापाची लाट निर्माण केली आहे. अत्यंत क्लिष्ट ठरलेल्या या प्रकरणाचा तपास करताना राजकीय हस्तक्षेपाचे अडथळे येऊ शकते, ही शंका असल्याने सीमा पाहुजा यांना या प्रकरणाच्या चाैकशीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.
कोण आहेत सीमा पाहूजा ?
सीमा पाहुजा सध्या गाजियाबादला सीबीआय (एसीबी)मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारे देशभर खळबळ उडवून देणाऱ्या शिमला, हिमाचल प्रदेशच्या गुडिया रेप ॲण्ड मर्डर केसमध्ये तसेच हाथरस प्रकरणात सायंटिफिक टेक्नॉलॉजीचा वापर करून तंत्रशुद्ध पुरावे गोळा केले होते. त्याचमुळे अत्यंत गुंतागुंतीच्या या दोन्ही प्रकरणाचा उलगडा होऊन आरोपीं कोठडीत पोहचले होते.
विशेष म्हणजे, अत्यंत कडक, प्रामाणिक आणि कोणत्याही दडपणाला बळी न पडता नवनव्या तंत्राचा वापर करून त्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास यंत्रणांमध्ये नावारुपाला आल्या आहेत. त्यामुळे पॉलिटिकल कनेक्शन असलेली आणि गाजलेली मात्र क्लिष्ट प्रकरणे हाताळण्यासाठी सीमा यांना दिली जातात. उत्कृष्ट तपासाचे मॉडल ठरलेल्या २००७ आणि २०१८ च्या दोन प्रकरणात त्यांना दोन वेळा गोल्ड मेडल मिळाले आहे.
या आहेत आरती सिंग
आयपीएस आरती सिंग टेक्नोसॅव्ही तसेच भिडस्त अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सध्या त्या मुंबईला पोलीस महासंचालनालयात पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरती यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तीन बहिणींच्या रहस्यमय मृत्यूची तसेच विधवा, एकाकी महिलांना जाळ्यात अडवून त्यांना गर्भवती करायचे आणि त्याचे बाळ विकण्यासाठी महिलांची हत्या करायची, असा आरोप असणाऱ्या एका प्रकरणाची चाैकशी केली होती. याशिवायही त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवून अनेक मेडल मिळवलेले आहे. कसल्याही राजकीय दडपणाला भीक न घालता थेट भिडणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांनी अमरावती येथे काम करताना स्वत:ची ओळख करून दिली आहे. आता बदलापूरच्या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली आहे.