योगेश पांडे, नागपूर : एका वाहनाच्या चोरीत पकडलेल्या आरोपींनी ११ दुचाकी चोरल्याची बाब चौकशीतून उघड झाली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
३० सप्टेंबर २०२३ रोजी मुकेश नारनवरे (४३, मोहगाव झिल्पी) यांची मोटारसायकल शेताजवळून चोरी गेली होती. या प्रकरणात हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता व पोलीस तपास करत होते. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून तसेच तांत्रिक तपासातून पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या रितीक श्रीराम वाघाडे (२३, हिंगनी, धामनगाव, सेलू, वर्धा), प्रणिकेत केशवराव नागोसे (१९, हिंगनी, सेलू, वर्धा) तसेच रविंद्र उर्फ रवी वामन मढवे (३४, गळव्हा, यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांनी मोटारसायक चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहर व वर्धा जिल्ह्यातून ११ दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले, पांडुरंग जाधव, आनंद वानखेडे, अजय गिरडकर, नागेश दासरवार, संतोष येलूर, विनोद दुरदकर, मनिषा भेंडाकर, जयश्री किरवे, दिपाली वैरागडे, वैशाली सांडेल यांच्या पथकाने ही कारवाई केली.