मुख्यमंत्री फडणवीस : कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना राज्य सरकार राबविणार असून, याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांत शेतकऱ्यांना वीज, सिंचन, बाजारपेठ व वेअरहाऊस आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. यासाठी केंद्र सरकार व विदेशातून निधी उभारला जाईल. मागील सरकारच्या पापामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना देशात आजवर दिलेल्या कर्जमाफीच्या तुलनेत सर्वाधिक कर्जमाफी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्कालीन केंद्रातील यूपीए सरकारने ५२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. यातील केवळ सात हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले होते. विद्यमान राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून स्वराज्याचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न - गडकरी राज्य सरकारने राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक व संवेदनशील निर्णय घेतला आहे सोबतच शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची योजना
By admin | Published: June 26, 2017 1:45 AM