नागपूर : जास्त नफ्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून रक्कम घेऊन ती परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका फर्मच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सावन कॅपिटल’ असे संबंधित फर्मचे नाव असून सुमित आकरे (३७) या संचालकाला अटक करण्यात आली आहे. एका गुंतवणूकदाराने केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून सुमितने अनेकांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.
हर्षल रंगारी यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली. सुमितने ‘सावन कॅपिटल’ नावाची फर्म सुरू केली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याने रंगारी यांना संपर्क केला व गुंतवणूक करण्याबाबत माहिती दिली. दहा लाखांच्या रकमेवर ६ टक्के तर त्याखालील गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के व्याज मिळेल. ३० टक्के रक्कम शेअर बाजारात, तर ७० टक्के रक्कम जमीन व सोन्यात गुंतविण्यात येत आहे. माझ्याकडे १०० हून अधिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे, अशी सुमितने बतावणी केली. हर्षल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आईच्या नावावर १९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपीने स्वत:हून कधीच परतावा दिला नाही. प्रत्येकवेळी रंगारी यांनी त्याला पैसे मागितले. ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमितने त्यांना १२ लाख रुपये परत केले. मात्र नफा व उर्वरित ७ लाख रुपये परत केलेच नाही. त्यानंतर तो फोन उचलण्यासदेखील टाळाटाळ करू लागला. अखेर रंगारी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. या प्रकरणात अर्जाच्या चौकशीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविला असून सुमितला अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडून अनेकांना गंडा
सुमितने नफ्याचे आमिष दाखवत अनेक जणांची फसवणूक केल्याचा पोलिसांना अंदाज आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ज्या लोकांनी ‘सावन कॅपिटल’मध्ये गुंतवणूक केली होती व ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.