कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : मध्य प्रदेशातील कामगारांना हाेळीचे विशेष महत्त्व असल्याने नागपूर व परिसरात काम करणारे मध्य प्रदेशातील शेकडाे कामगार त्यांच्या मूळ गावाकडे निघाले आहेत. ते ट्रॅव्हल्सने नागपूर शहरातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात असलेल्या मानेगाव (टेक) परिसरात येतात. कमाल ४० प्रवाशांची क्षमता असलेल्या या प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये ६५ ते ७० प्रवासी काेंबले जातात. या बसमध्ये मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या महत्त्वाच्या उपाययाेजनांचे मुळीच पालन केले जात नसल्याने हा प्रकार काेराेना संक्रमणाला निमंत्रण देणारा ठरत असताना, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
मध्य प्रदेशातील हजाराे कामगार नागपूर शहर व परिसरात काम करतात. ते सर्व हाेळी साजरी करण्यासाठी कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी जात आहेत. नागपूरहून देवलापार मार्गे मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये ७० टक्के प्रवासी विनामास्क असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील वाहनांवर तात्पुरता प्रतिबंध घातल्याने तसेच मध्य प्रदेशातील नागरिकांसाठी ही अट शिथिल असल्याने या ट्रॅव्हल्स कामगारांना मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या रामटेक तालुक्यातील मानेगाव (टेक) शिवारातील एकसा धाब्याजवळ साेडतात. राेज किमान १५ ट्रॅव्हल्स कामगारांना नागपूरहून या भागात आणतात.
काेराेना संक्रमणामुळे महाराष्ट्रीय माणसाला मध्य प्रदेशात प्रवेश दिला जात नाही. काेराेना संक्रमित महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या मध्य प्रदेशातील कामगारांना मात्र सहज प्रवेश दिला जाताे. उपाययाेजनांचे उल्लंघन करीत हे कामगार मध्य प्रदेशात जातात. त्यांच्यामुळे मध्य प्रदेशात काेराेना संक्रमित हाेत नाही का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित हाेताे. दुसरीकडे, मध्य प्रदेश सरकारचा हा निर्णय महाराष्ट्रीय नागरिकांना वेठीस धरणारा असल्याचा आराेप काही नागरिकांनी केला आहे.
....
२० कि.मी.चा प्रवास जीपने
या प्रवासाचे मानेगाव टेक (महाराष्ट्र) व मिटेवाणी-सेटेवाणी (मध्य प्रदेश) असे दाेन अड्डे आहेत. मानेगाव टेक ते मिटेवाणी हे अंतर २० कि.मी. आहे. मानेगाव टेक शिवारातील धाब्याजवळ ट्रॅव्हल्समधून उतरलेले कामगार जीपने मिटेवाणी शिवारातील धाब्याजवळ जातात. त्या ठिकाणाहून ते दुसऱ्या वाहनाने त्यांच्या गावाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात. या जीपमधून प्रत्येकी १८ ते २२ कामगार प्रवास करतात.
...
सीमा तपासणी नाके
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक (महाराष्ट्र) तालुक्यातील मनसरनजीक तसेच मध्य प्रदेशातील मिटेवाणीच्या पुढे, असे दाेन सीमा तपासणी नाके आहेत. या ट्रॅव्हल्स मनसरनजीकचा नाका सहज पार करतात. त्या कामगारांना मिटेवाणी येथील नाक्याच्या अलीकडे साेडले जाते. तिथून ते एक कि.मी.चा प्रवास पायी करतात आणि नंतर दुसऱ्या वाहनाने प्रवासाला सुरुवात करतात. हा प्रकार महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सीमा तपासणी नाक्यांवरील अधिकाऱ्यांना माहिती असूनही कुणीही कारवाई करीत नाहीत.
...
कष्टप्रद प्रवास
गांधीबाग, नागपूर येथून सकाळी ८ वाजताच्या सुमारास निघणारी ट्रॅव्हल्स दुपारी २ वाजताच्या सुमारास मानेगाव टेक शिवारात पाेहाेचते. त्यानंतर कामगार मिटेवाणी शिवारात जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा अर्थात २० कि.मी.चा प्रवास करतात. नंतर एक कि.मी. पायी जातात. त्यांचा हा संपूर्ण प्रवास खाण्या-पिण्यावाचून असताे. त्यांना तिसऱ्या टप्प्यातील काही प्रवास पायी करावा लागताे. नागपूर-शिवनी हे अंतर मुळात चार तासाचे असताना, या प्रवासात कामगारांचा संपूर्ण दिवस जाताे.