लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - २१ लाखांच्या लूटमार प्रकरणातील एका आरोपीला लकडगंज पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. व्यंकटेश ऊर्फ गोलू कोहाड (वय २२) असे त्याचे नाव असून, त्याचा तीन दिवसांचा पीसीआर लकडगंज पोलिसांनी मिळविला आहे. त्याचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कमलेश शहा यांच्या कुरिअर कंपनीत व्यवस्थापक असलेले रोहित पटेल यांनी रमणभाई पुरुषोत्तमदास पटेल (वय ५८) आणि पीयूष मनूभाई पटेल (३४) या दोघांना शनिवारी दुपारी २१ लाखांची रोकड दिली. ही रोकड ॲक्टिव्हाच्या डिक्कीत ठेवून ते छापरूनगर चाैकाकडे निघाले होते. बैरागीपुऱ्यातील चिंतेश्वर मंदिराजवळ मागून ॲक्टिव्हावरून आलेल्या तीन भामट्यांनी रमणभाई आणि पीयूषला अडविले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची ॲक्टिव्हा हिसकावून नेली होती. लकडगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे छडा लावत आरोपी कोहाडला अटक केली. प्राथमिक तपासात त्याने बारापात्रे आणि कृष्णा नामक साथीदारांच्या मदतीने ही लूटमार केल्याचे मान्य केले आहे. आरोपी कोहाड, कृष्णा आणि बारापात्रे हे तिघेही पाचपावलीच्या नाईक तलाव परिसरात राहतात. त्यांचे क्राइम रेकॉर्डही पुढे आले आहे. रविवारी कोहाडला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा ३० सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळविला.
---
दोन दिवस पाळत ठेवून लुटली रक्कम
आरोपींनी दोन दिवस पाळत ठेवून ही लूटमार केल्याचे समजते. लूटमार केल्यानंतर अडीच लाख रुपये देऊन कृष्णा आणि बारापात्रे हे दोघे पळून गेल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. ते कुठे गेले, कसे गेले त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, ही लूटमार टिप देऊन करवून घेण्यात आल्याचा दाट संशय आहे. तो टिपर पटेल यांच्या संपर्कातील असावा, असाही संशय आहे.
---
गुजरात-गोल्ड-कक्कड कनेक्शन
ही रोकड हवालाचीच असल्याची जोरदार चर्चा आहे. या लूटमारीच्या घटनेचे कनेक्शन गुजरातच्या काही हवाला व्यावसायिकांसोबत असल्याची चर्चा हवाला बाजारात आहे. सोने तस्करीचाही अँगल या प्रकरणाला असून, अशा प्रकरणात मांडवलीसाठी नेहमीच पुढे असलेल्या कक्कड, मामाचेही नाव पुन्हा चर्चेला आले आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यास आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता संबंधितांकडून वर्तविली जात आहे.
----