लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : सावरगाव (ता. नरखेड) ग्रामपंचायतने १५ वा वित्त आयाेग व स्वनिधीअंतर्गत करावयाच्या विकास कामांच्या ई-निविदा प्रक्रियेत सरपंच व सचिव यांनी संगनमताने घाेळ केला. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्यात यावी, अशी उपसरपंचासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाच्या चाैकशीचे बुधवारी (दि. १८) आदेश दिले आहेत.
या ग्रामपंचायतला १५ वा वित्त आयोग व स्वनिधीमधून काही कामे करावयाची हाेती. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ११ मे २०२१ राेजी निविदा आयडीवरून जनसुविधा आणि नागरी सुविधाअंतर्गत करावयाच्या कामांना लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. या निविदा १९ मे २०२१ राेजी उघडण्याचे निर्धारित असताना त्या ३१ मे २०२१ राेजी उघडण्यात आल्या. त्यासाठी संगणकीय तक्ता तयार करून ३१ मे २०२१ च्या मासिक सभेत ठराव क्रमांक ८ द्वारे सभागृहाची दिशाभूल करून पारित केल्याचा आराेप उपसरपंच कोठीराम दाढे, ग्रामपंचायत सदस्य राजू गिरडकर, राजेंद्र रेवतकर, कलावती काळबांडे, सिंधू रेवतकर व रोहिणी बेलखेडे यांनी केला आहे.
प्राप्त निविदा ऑनलाईन प्रणालीद्वारे न उघडता तसेच तांत्रिक बाबींची तपासणी न करताच सरपंच, सचिव व कंत्राटदार यांनी संगनमत करून बनावट ई-निविदेचा तुलनात्मक तक्ता तयार केला. तो ऑनलाईन तक्ता असल्याचे भासवून मासिक सभेत कमिटीची दिशाभूल करण्यात आली. खोट्या दस्तऐवजाच्या आधारे त्रिमूर्ती बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सची निविदा मंजूर करण्यात आली, असेही या सदस्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
बनावट दस्तऐवजद्वारे सरपंच व सचिव यांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत नियमबाह्य खर्च केला. त्यामुळे सरपंचाविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९/१ तसेच सचिवाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९८१ नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. खोट्या दस्तऐवजाद्वारे विशिष्ट व्यक्तीला लाभ देण्याकरिता सरपंच, सचिव व कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
...
अस्तित्वात नसलेल्या फर्मला कंत्राट
ग्रामपंचायतच्या मासिक सभेत दर्शविलेल्या तक्त्यानुसार त्रिमूर्ती बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, त्रिमूर्ती हार्डवेअर अँड टाईल्स व श्री गणेश इंटरप्रायजेस यांच्या ‘जीएसटीएन’ नसल्याचे ई-निविदेत दर्शविले आहे. त्रिमूर्ती बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स व त्रिमूर्ती हार्डवेअर अँड टाईल्सचे मालक आई व मुलगा असल्याने एकाच कुटुंबाचे घटक आहेत. त्रिमूर्ती हार्डवेअर व टाईल्स नावाची फर्म अस्तित्वात नाही, असेही तक्रारकर्त्यांनी सांगितले.
...
चाैकशीचे आदेश
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी या प्रकरणाची चाैकशी करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने उप मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांनी नरखेडचे खंडविकास अधिकारी प्रशांत माेहाेड यांना या प्रकरणाची चाैकशी करून तीन दिवसात चाैकशी अहवाल सादर करण्याचे बुधवारी (दि. १८) लेखी आदेश दिले आहेत.
...
साहित्य पुरवठ्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. ई-निविदा असल्याने बनावट करणे शक्यच नाही. सर्व प्रक्रिया नियमानुसारच करण्यात आली. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. विराेधक प्रत्येक विकास कामात आरडाओरड करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.
- प्रगती ढोणे, सरपंच,
ग्रामपंचायत, सावरगाव.
...
वार्षिक नियोजनांतर्गत नागरी सुविधांच्या १२ कामासाठी प्रत्येकी ५ लाखाप्रमाणे ६० लाख रुपये मंजूर झाले. त्यामुळे साहित्य पुरवठ्यासाठी ई-निविदा प्रकाशित करून त्या मागविण्यात आल्या. सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली. सर्वात कमी किमतीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीदरम्यान सत्य बाहेर येईल.
- रमेश बन्नगरे, सचिव,
ग्रामपंचायत, सावरगाव.