नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जानेवारी महिन्यात १३ ते १५ तारखेदरम्यान संशोधक आणि उत्साही नागरिकांसाठी पहिले पक्षी सर्वेक्षण राबविले जाणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे हे पहिलेच आयोजन आहे.
टिन्सा इकोलॉजिकल सोल्युशन्स आणि शंभरांहून अधिक पक्षीप्रेमी, संशोधक आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व सातही वनपरिक्षेत्रांमधील नागरिकांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. या उपक्रमासंदर्भात पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सहभागी लोकांना ६३ संरक्षण कुटीचे वाटप केले जाईल. प्रत्येक संरक्षण कुटीवर, किमान एक संशोधक किंवा पक्षीतज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखाली तीन ते पाच लोक तीन दिवस राहतील. त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाईल.
यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ३१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज https://forms.gle/awgWokM1LFGGqCQRA या लिंकवर अर्ज करायचा आहे. निवडलेल्या सहभागींना ५ जानेवारी २०२३ पर्यंत मेलद्वारे कळविले जाणार आहे.
पक्ष्यांची संख्या पोहाेचली ३१० वर
सी.आय.बी.ए. (सेंट्रल इंडिया बर्ड अकादमी)च्या माहितीनुसार, अलीकडेच महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पक्ष्यांच्या यादीनुसार पूर्वी १७० पक्षी होते. ही संख्या वाढून आता ३१० झाली आहे. या संशोधनामुळे व्याघ्र प्रकल्पात विविध पक्ष्यांच्या प्रजातींची विपुलता आणि वितरणाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. अधिक माहितीसाठी www.penchtigerreserve.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येणार आहे.