लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिल्लर दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. तिची सासूही या अपघातात जखमी झाली. आजीच्या कडेवर असलेली जखमी महिलेची मुलगी सुदैवाने बचावली. सेंट्रल एव्हेन्यूवर रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.अमी जय जोशी (वय २४) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. हिवरीनगर, भीम चौक नंदनवन येथे राहणाºया अमी जोशी, दीड वर्षीय मीरा नामक मुलगी आणि सासू साधना जोशी यांच्यासह अॅक्टिव्हाने (एमएच ४९/क्यू ०५३७) गांधीबागकडे जात होत्या. सेंट्रल एव्हेन्यूवरील छापरूनगर-आंबेडकर चौकाजवळच्या हनीशीला अपार्टमेंटसमोर अचानक मेट्रोच्या कामासाठी लावलेला एक लोखंडी कॉर्टर पिल्लर जोशी यांच्या दुचाकीवर आदळला. त्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अमी जोशी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मागे बसलेल्या सासू साधना यांनाही मार लागला. सुदैवाने आजीच्या कडेवर असलेल्या चिमुकल्या मीराला मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. या तिघींनाही तातडीने बाजूच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.जमाव वाढत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे तणावात मोठी भर पडली. वाहतूक पोलीस आणि लकडगंज पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. वाहतूकही सुरळीत करण्यात आली. हा अपघात मेट्रोच्या अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप करून नागरिकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर रुग्णालयात साधना जोशी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. अॅन्थोनी यांनी मेट्रोचे काम करणारे कमलकिशोर सुरेंद्रकुमार शर्मा (वय ४८, रा. सुभाषनगर नजीमाबाद, जि. बिजनौर), सहायक अभियंता नीलेश पराते, नरेंद्र कुमार आणि शिशिर सिंग यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
मेट्रोकडून चौकशी अन् कारवाईयासंबंधाने बोलताना मेट्रोचे प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी लोड टेस्टिंग करताना पाऊस आल्यामुळे लोखंडी पिल्लर खाली पडल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले. हे बांधकाम आयटीडी सिमेंटेशन कंपनी आणि सुरक्षेची जबाबदारी फ्रान्सची कंपनी एजीआयईएसला सोपविण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आयटीडी कंपनी आणि सेफ्टी जनरल कन्सल्टंटच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने दोघांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रकल्प संचालक महेश कुमार अग्रवाल यांनी जखमी महिलेच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी प्रत्येक बांधकामस्थळी विशेष सावधगिरी बाळगण्याचे निर्देश संबंधितांना दिले असून, यापुढे कोणत्याच प्रकारची दुर्घटना होणार नाही, याची खास काळजी घेण्याचेही कळविले आहे.