नागपूर : राज्य परिवहन महामंडळातील एसटी कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक स्थापन करण्यात आलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई-१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात येईल. तसेच बँकेतील अनियमिततेबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
बँकेकडे अजूनही १८४४ कोटी रुपयांचे भांडवल आहे. बँकेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. कर्जाचे व्याजदर ठरविण्याचा अधिकार बँकेच्या संचालक मंडळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याअंतर्गत त्यांनी व्याजदर ९ ते १४ टक्क्यांवरून ७ टक्के केला आहे.
संचालक मंडळाने एकूण १४ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सुधारणा करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यानंतर बँकेने सर्व निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, यामिनी जाधव, हरिभाऊ बागडे, अजय चौधरी, बाळासाहेब पाटील आदींनी भाग घेतला.