लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यात २७ हजारांचे उद्दिष्ट असताना जेमतेम ५३७ पथदिवे बदलविले. त्यामुळे जे.के. सोल्युशन इंक कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. आता या कंपनीने महापलिकेकडे १७ कोटींची थकबाकी असल्याचा दावा केला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये झोननिहाय एलईडी बसविण्याचे कंत्राट देण्यात आले. निविदातील शर्ती व अटीनुसार ७० ते ८० टक्के अधिक दराने नवीन कंत्राटदारांना काम देण्यात आले. यात कोट्यवधींचा घोळ असल्याचा आरोप करून विरोधकांनी यावर सभागृहात चर्चेची मागणी केली आहे.जानेवारी २०१७ नवीन कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली. मार्च २०१८ पर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवर १ लाख २५ हजार एलईडी पथदिवे लावणे अपेक्षित होते. प्र्रत्यक्षात २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. पथदिव्यांचे काम दोन टप्प्यात करावयाचे होते. पहिल्या टप्प्यात पथदिव्यांचे खांब व केबल बदलविण्यात येणार आहे. यावर ५०.०३ कोटी, तर दुसऱ्या टप्प्यातील पथदिवे बदलविण्यात येणार आहे. यावर १५८.९९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील निविदात शर्ती व अटीच्या तुलनेत ८० टक्के अधिक दराने तर दुसऱ्या टप्प्यात ७० टक्के अधिक दराने काम देण्यात आले आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप असून काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी याबाबतचा प्रश्न पुढील सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी दिला आहे.
बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट दर
महापालिकेला दरवर्षी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. बसविण्यात येत असलेल्या एका एलईडीचा खर्च ९ हजार ९०० रुपये आहे. मात्र याच दिव्याची खुल्या बाजारातील किंमत ३ हजार ६०० रुपये आहे. यात मोठ्याप्रमाणात अनियमितता झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संदीप सहार यांनी केली आहे. यासंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्तांनाही निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली.