दोन्ही कंपन्यांचे काम असमाधानकारक : महापौरांना अहवाल देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी दोन कंपन्यांकडे कचरा संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली. यात एजी एन्व्हायरो कंपनीकडे झोन १ ते ५, तर बीव्हीजीकडे झोन ६ ते १० ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु दीड वर्ष झाले तरी करारानुसार दोन्ही कंपन्या काम करत नाही. कचऱ्यात माती मिसळत असल्याच्या तक्रारी आहेत. २८ मे रोजी आयोजित मनपा सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थगन प्रस्ताव आणला होता. यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मंगळवारी यासाठी समितीची घोषणा करण्यात आली.
मनपातील सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीत आरोग्य समितीचे सभापती संजय महाजन, नितीन साठवणे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार आदींचा समावेश आहे. समिती चौकशी अहवाल महापौरांना सादर करेल. त्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल.
करारानुसार घराघरांतून कचरा संकलन करावयाचा आहे. परंतु शहरालगतच्या भागात दोन-तीन दिवसांनंतर कचरागाडी येते. बाजारातही नियमित कचरा संकलन होत नाही. एजी एन्व्हायरो कंपनीने १२३ तर बीव्हीजी कंपनीने ११४ कर्मचारी अतिरिक्त ठरवून त्यांना कमी केले. कर्मचारी कमी असल्याचा कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. झोन स्तरावर मनपा प्रशासनाकडून योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले जात नाही.
....
कंपनीच्या अधिकाऱ्यांची मनमानी
दोन्ही कंपन्यांनी नियुक्त केलेले अधिकारी सर्वसामान्य नागरिकांचे सोडा नगरसेवकांनाही जुमानत नाही. मनपा अधिकाऱ्यांचे आदेश मानत नाही. कारवाई करण्याची तंबी देताच कंपनीला तोटा असल्याचे सांगून काम बंद करण्याचा इशारा देतात. याचा विचार करता चौकशीची गरज आहे, अन्यथा नागपूर स्वच्छतेत पुन्हा माघारल्याशिवाय राहणार नाही.