लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाची साखळी खंडित व्हावी, यासाठी नागपूर शहरात कठोर निर्बंध लावण्यात आले. नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने संक्रमणाला आळा बसला. परंतु शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात होताच काही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. सकाळी ११ पर्यंत आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश आहे. परंतु या आदेशाचे उल्लंघन होत आहे. काही नागरिकांचा बेजबाबदारपणा संभाव्य संकटाला निमंत्रण तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील प्रमुख बाजार व पोलीस तैनात असलेली ठिकाणे वगळता शहरालगतचा भाग, वस्त्यात नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. दुकाने दुपारपासून सायंकाळपर्यत उघडी ठेवली जातात. पूर्व नागपूर असो की पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम, उत्तर व मध्य नागपुरात अशीच परिस्थिती आहे. भाजीपाला, फळ विक्रेत्यांची दुकाने रस्त्याच्या बाजूला लागतात. पोलीस वा मनपाच्या पथकाला बघताच पळून जातात. काही वेळानंतर पुन्हा येतात. दुकाने लावल्याने कोरोना संक्रमण होत नसल्याचे काही दुकानदारांचे म्हणणे आहे. अनेक दुकानदार मास्क वापरत नाही. सुरक्षित अंतर पाळले जात नाही.
पूर्व नागपुरातील कळमना व पारडी भागाचा फेरफटका मारला तर सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे दिसून येईल. गुलमोहरनगर चौकात आठवडी बाजार भरतो. सध्या परवानगी नसतानाही बुधवारी सायंकाळी बाजार भरला. भाजीपाला, फळे याशिवाय कापड विक्रेते व हातगाड्यावर दुकाने लागली होती. वाठोडा बाजारातही असेच चित्र आहे. जयताळा, सक्करदरा, इतवारी भाजीबाजारातही अशीच परिस्थिती आहे. शहरात ठिकठिकाणी फळविक्रेते व दुकाने दिसतात. यावर आक्षेप नाही. परंतु मास्क वापरत नाही, सुरक्षित अंतर पाळले जात नाही.
.......
घोळक्याने मॉर्निंग वॉक
शहरातील उद्याने शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आलेली आहेत. परंतु नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. संक्रमणाचा अधिक धोका असताना फिरणाऱ्यांची गर्दी नव्हती. परंतु गेल्या काही दिवसात घोळक्याने मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जपानी गार्डन, सेमिनरी हिल्स आदी भागात सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी असते. दक्षिण नागपुरातील वंजारीनगर पाणी टाकी, रेशीमबाग परिसरात नागरिक फिरताना दिसतात. आरोग्यासाठी फिरणे चांगले असले तरी संक्रमणाचा धोका विचारात घेता खबरदारी आवश्यक आहे. गर्दी होणाार नाही याची प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.