नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एम.काॅम. चाैथ्या सेमिस्टरच्या ८० विद्यार्थ्यांना सहा महिन्यांपासून झुलावे लागत आहे. या विद्यार्थ्यांनी साेडविलेल्या ‘अप्रत्यक्ष कर’ या विषयाच्या उत्तरपत्रिका बी.काॅम. ची उत्तरपुस्तिका पाहून तपासण्यात आल्या. परिणामी कमी गुण मिळाले. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तिपटीने वाढलेले आढळले. मात्र, विद्यापीठाने सहा महिने लाेटूनही गुणपत्रिकेत अद्ययावत केले नाही. चुकीच्या गुणांमुळे मुलांचे सीजीपीए रँक घसरले असून, त्यांच्या करिअरवर प्रश्न निर्माण झाला आहे.
हे विद्यार्थी डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या एम.काॅम. च्या २०२०-२०२२ बॅचचे आहेत. जून २०२२ ला झालेल्या चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्ष कर विषयाचा पेपर दिला. १५ जुलै २०२२ ला निकाल जाहीर झाले तेव्हा, या विषयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ ३० गुण मिळाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी या गुणांवर आक्षेप घेतल्यानंतर चाैकशी केली असता एम.काॅम.च्या इंडायरेक्ट टॅक्स विषयाच्या उत्तरपत्रिका बी.काॅम.च्या याच विषयाच्या ‘उत्तर की’वरून तपासण्यात आल्याची बाब १६ जुलैलाच उजेडात आली.
विशेष म्हणजे पुनर्मू्ल्यांकनात या विद्यार्थ्यांना संबंधित विषयात ९० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविल्याचे लक्षात आले. त्यावेळी प्रभारींनी पुनर्मूल्यांकन करून आठवडाभरात सुधारित गुण विद्यापीठाच्या वेबपेजवर आणि अंतिम गुणपत्रिकेवरही अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सहा महिने लाेटले तरी विद्यापीठाने निकालाच्या पानावर किंवा महाविद्यालयांनी वितरित केलेल्या मूळ गुणपत्रिकेत काेणताही बदल केला नाही.
चुकीच्या गुणांमुळे रँक घसरले
दरम्यान, १२ जानेवारी २०२३ ला विद्यापीठाने या बॅचच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. मात्र, या ८० विद्यार्थ्यांचा सीजीपीए चुकीच्या गुणांवर आधारित असल्याने त्यांची रँक घसरली. सुधारित गुण जाेडल्यास ते रँकसाठी पात्र ठरतील. सुधारित गुणवत्ता यादी तीन-चार दिवसांत अपलाेड करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण पुढे काही झाले नाही. याबाबत महाविद्यालयाचे अधिकाऱ्यांनी विद्यापीठ काौन्सिलशी संवाद साधत असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांना तक्रार
सहा महिन्यांपासून सुधारित गुणांसह गुणपत्रिका अद्ययावत हाेत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागताे आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठांकडूनही विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष हाेत असल्याने या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.