नागपूर : जिल्ह्यामध्ये अनधिकृत असलेल्या शाळा यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही काही शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्या शाळा, विद्यार्थी, पालकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा कुठल्याही शाळेमध्ये प्रवेश घेताना, त्या शाळेस मान्यता असल्याबाबतची खात्री करावी. सदर मान्यता कोणत्या बोर्डाची (राज्य,सीबीएसई,आयसीएसई)आहे, याची खात्री केल्यानंतरच प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले आहे.
शिक्षण विभागाकडून काही अनधिकृत शाळांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल होऊनही त्या शाळा प्रत्यक्षात बंद करत नाहीत. अशात बालकांचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्याचे उल्लंघन त्या शाळांकडून होत आहे. अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश देवू नये. पालकांनी शाळेमध्ये पाल्यास प्रवेश देताना शाळेस मान्यता असल्याबाबतची खात्री करावी. सदर मान्यता कोणत्या बोर्डाची आहे, याची खात्री करुन प्रवेश घ्यावा, असे आवाहन केेले आहे.
...तर अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करा
क्षेत्रीय अधिकारी,उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांना सूचना देण्यात आल्या आहेत. की, त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरु होणार नाही. याची दक्षता घ्यावी. सुरू झाल्यास अशा शाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात. प्रशासकीय बाबी पूर्ण करूनही शाळा बंद होत नसल्यास संबंधित शाळांवर गुन्हे नोंदविण्यात यावे व याबाबत पालकांना अवगत करण्यात यावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.