भारतीय मीडियाचं ध्रुविकरण झालं आहे का? य मुद्यावर बोलताना लोकमत मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश म्हणाल्या की, ध्रुवीकरण चांगली बाब आहे. कारण आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत. सोशल मीडिया आहे. कुणालाही कुठल्याही बाबतीत सांगण्यासाठी आमची गरज नाही.
यावेळी मीडिया आपल्या बातम्या कव्हर करत नाही, या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी म्हणतात की, मीडिया पक्षपाती झालाय, तो माझ्या बातम्या कव्हर करत नाही. मात्र भारत जोडो यात्रेतील एक एक दिवस भारतीय मीडियाने कव्हर केला आहे. राहुल गांधी जेव्हा प्रेस कॉन्फ्ररन्स करतात तेव्हा सर्व वृत्तवाहिन्या ती कव्हर करतात. हा मोदी समर्थक आहे. हा राहुल समर्थक आहे. हा पवार समर्थक आहे, हा ममता समर्थक आहे, असा आरोप करणं सोपं आहे. मात्र आता शिव्या खाऊन खाऊन आमची चामडी घट्ट झाली आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत स्मिता प्रकाश यांनी सांगितलं की, भारतीय मीडिया आपलं काम करत नाही आहे, अशी वातावरणनिर्मिती परदेशी मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आम्ही बातम्या कव्हर करत नाही, तर सरकारच्या विचारांचं पालनपोषण करत आहोत, असा आरोप होतो. तीन दिवसांपूर्वी टाइम मॅगझिनमध्ये एक बातमी प्रसारित झाली होती. तिचा मुख्य मुद्दा हा अमृतपाल याला अटक करण्याच्या मोहिमेत झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा होता. त्याचं कारण म्हणजे यावेळी इंटरनेट आणि मेसेजिंगवर निर्बंध आणले गेले होते. मात्र या मंडळींना पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीनसारख्या देशात होणाऱ्या अशाच प्रकारांची चिंता नसते, असा टोला त्यांनी लगावला.
माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.