नागपूर : धनगवळीनगरातील एका कुटुंबीयांनी घराच्या बांधकामासाठी एक ट्रॉली रेती आणून कम्पाऊंडच्या पुढे टाकली आणि तासाभरातच हनुमाननगर झोनचे उपद्रव शोधपथकातील दोन सदस्य त्यांच्या घरापुढे येऊन रेती ४८ तासांत उचला, अन्यथा २००० रुपयांचा दंड भरा, असा नोटीस बजावून गेले. उपद्रव शोध पथकातील सदस्य म्हाळगीनगर, संजय गांधी नगर, विठ्ठलनगर, ढगेचा बंगला या परिसरातील गल्लोगल्ली फिरून लोकांचे बांधकामाचे साहित्य बाहेर पडले असेल तर कारवाई करतात. पण विठ्ठलनगरच्या मुख्य रस्त्यावर सरकारी कामाचे पडलेले बोल्डर मुरूमाचे ढिगारे त्यांना दिसत नाही. हे बोल्डर मुरूमचे ढिगाडे वाहतुकीस अडथळा नाही का? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महापालिकेने उपद्रव शोध पथकाची रचना केली. या पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी करण्यात येत असलेल्या अस्वच्छतेबाबत तसेच रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या बांधकामाच्या साहित्याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येते. नागपुरात उपद्रव शोध पथक जास्तच ॲक्टिव्ह झाले आहे. पथकातील सदस्य वस्त्या वस्त्या गल्ल्या गल्ल्या फिरून कारवाई करीत आहे. पथकाकडून कारवाईचा अतिरेक होत असल्याने लोकांची नाराजीही वाढत आहे.
दक्षिण नागपुरातील विठ्ठलनगरात ३० फुटांच्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. तर महिन्याभरापासून पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेजलाइनचे काम सुरू आहे. या कामाचे मटेरियल महिन्याभरापासून रस्त्यावर पडलेले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. तर याच भागात राहणारे नीलेश रेंगे यांच्या घरी रिपेरिंगचे काम सुरू होते. त्यांनी एक ट्रॉली रेती आणली, कंपाऊंडला लागून रस्त्याच्या कडेला ठेवली. कारवाईसाठी पथकाचे लोक आले. ४८ तासांत बांधकामाचे साहित्य उचला असे सांगून गेले. त्यांनी लगेच ५०० रुपयांचा मजूर बोलाविला आणि रेती आत टाकली.
- सेटलमेंटची पावती नाही
अनंत विंचुरकर यांच्या घरी बांधकाम सुरू असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला मटेरियल टाकले. त्यांच्याकडे एनडीएसचे दोन लोक आले. त्यांचा मुलगा होता त्याला सेटलमेंट करण्यासाठी १ हजार रुपये मागितले. मुलाने पावती मागितली तेव्हा २ हजार रुपये मागितले आणि २ महिन्यांची मुदत आहे. त्याच्या आतमध्ये मटेरियल उचलायला सांगितले. आतापर्यंत त्यांना दोन वेळा विचारून झाले मुदत संपली का?
- पावती दिली, पण पैसे भरले नाही
दिलीप बावनकुळे मिलिटरीमधून रिटायर्ड आहे. यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्याकडे दोन वेळा येऊन गेले पावती पण दिली. पण त्यांनी पैसे देण्यास मनाई केली.
- कुठून आणायचे पैसे
किशोर खडसे कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांचे परिसरात तीन ठिकाणी काम सुरू आहे. एनडीएसकडून कारवाई होत असल्याने ते मटेरियल रस्त्यावर येऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतात. तरीही त्यांच्या तीनही ठिकाणी पावत्या फडण्यात आल्या. यांनाही फोन आला सोमवारी परत येतो.
- दंड भरल्यावर वाहतुकीला अडथळा नाही
पथकाने एकदा दंडात्मक कारवाई केल्यावर २ महिन्यांची मुदत दिली जाते. या दोन महिन्यांत रस्त्यावर बांधकामाचे साहित्य कितीही पसरवा मग अडथळा होत नाही.