- आशिष दुबेनागपूर - नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयचा एक एजंट आणि एका पाकिस्तानी नागरिकास नागपुरातून अटक केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आणखी एक दुसरा एजंट आणि तीन अन्य पाकिस्तानी नागरिकांची अटक व्हायची होती.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरसह देशातील काही भागांमध्ये पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय एजंट सक्रिय झाल्याची माहिती मिलिट्री इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार एजंटांवर पाळत ठेवली जात होती. मिलिट्री इंटेलिजन्स आणि एटीसी मिळून हे काम करीत होते. या दरम्यान मिळालेल्या गंभीर माहितीनुसार देशातील चार ठिकाणी धाड टाकण्याची योजना बनवण्यात आली. नागपूर शिवाय पंजाब, उत्तर प्रदेशातील नोएडा आणि रायबरेली येथे एजंट लपून बसले होते.
सूत्रांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी दुपारी गणेशपेठ बस स्टॅँडजवळील एका इमारतीवर धाड टाकली असता त्यांना एक पाकिस्तानी एजंट घटनास्थळीच सापडला. पकडण्यात आलेला एजंट मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. याशिवाय नांदेड येथे राहणारा एक एजंट आणि तीन इतर पाकिस्तानी नागरिकांचाही चमू शोध घेत आहे.