नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव नहनुमा बाशिद असे असून, ती हैदराबाद येथील रहिवासी होय. म्हसाळा येथे तिचे माहेर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तपास यंत्रणांनी नहनुमाच्या आईलाही विचारपूस करण्यासाठी ताब्यात ठेवले होते.नहनुमा ही अब्दुल बाशिद नामक इसिसच्या हस्तकाची पत्नी असून, त्याला २०१६ मध्ये एनआयएने हैदराबाला जेरबंद केले होते. सध्या तो दिल्लीच्या तिहाड कारागृहात बंदिस्त आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, बाशिद हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला इसिससोबत जोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने त्यासाठी वेगवेगळे आॅनलाईन ग्रुप तयार केले होते. त्याची कुरापत ध्यानात येताच तपास यंत्रणांनी २०१६ मध्ये बाशिदच्या मुसक्या बांधल्या होत्या. ‘अबूधाबी केस’नावाने हे प्रकरण तीन वर्षांपूर्वी गाजले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर त्याचे इसिस कनेक्शन उघड होताच त्याला कारागृहात डांबण्यात आले. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहाड कारागृहात बंदिस्त आहे. दरम्यान, बाशिदची पत्नी नहनुमा तेव्हापासून अचानक भूमिगत झाल्यासारखी झाली होती. ते लक्षात आल्यापासून तिच्यासह अन्य काही जणांचा एनआयएसह विविध तपास यंत्रणा शोध घेत होत्या. गुरुवारी नहनुमा हैदराबादहून नागपूरकडे निघाल्याचे कळताच तपास यंत्रणा सतर्क झाली. ती शुक्रवारी वर्धा येथे उतरली आणि म्हसाळ्यात माहेरी पोहोचली. तिच्या मागावर असलेल्या एनआयएच्या पथकाने शनिवारी भल्या पहाटे छापा मारून नहनुमाला ताब्यात घेतले. तिच्या आईच्या घराची झडती घेतल्यानंतर एनआयएच्या पथकाने नहनुमाजवळच्या साहित्यासह तिला ताब्यात घेतले. तिच्या आईलाही विचारपूस करण्यासाठी (किंवा नहनुमाने उलटसुलट आरोप करू नये म्हणून) तपास पथकाने सोबत नेले. प्रारंभी गुप्त ठिकाणी नेऊन नहनुमाची प्रदीर्घ चौकशी केली. त्यानंतर या प्रकाराची सेवाग्राम पोलीस ठाण्यात नोंद करून तेथेही तिची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणेने ही कारवाई फारच गोपनीय पद्धतीने केली. नहनुमाची प्रारंभिक चौकशी संपेपर्यंत वर्धा पोलिसांनाही याबाबत फारशी माहिती देण्यात आली नाही.दरम्यान, या कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर विभाग (आयबी) तसेच नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी-कर्मचारी वर्धेला पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर नहनुमासोबत तिच्या निकटवर्तीयांचीही तपास पथकाचे अधिकारी चौकशी करीत होते. नहनुमा कधीपासून आणि कशा पद्धतीने इसिसच्या संपर्कात आली. गेली ती तीन वर्षे कुठेकुठे होती, कुणाच्या संपर्कात होती, काय करीत होती, त्याची चौकशी केली जात आहे.पाकिस्तानच्या संपर्कात?सूत्रांच्या माहितीनुसार, नहनुमा-बाशिदचे पाकिस्तानमध्ये नातेवाईक आहेत. बाशिदच्या अटकेपूर्वी तो निरंतर पाकिस्तानमध्ये संपर्कात होता तर, त्याच्या अटकेनंतर नहनुमादेखील पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात होती, असे समजते. हा संपर्क सहज होता की यामागे काही विशिष्ट माहितीची आदानप्रदान केली जात होती, त्याचीही तपास यंत्रणा चौकशी करीत आहे.पुन्हा एकदा वर्धा चर्चेतदहा वर्षांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या माध्यमातून सिमीने वर्धा जिल्ह्यात मोठा स्लीपर सेल तयार केला होता. त्यामुळे एटीएसने अनेकदा वर्धेत छापेमारीही केली होती, नंतर तेथील तरुणांचे कौन्सिलिंग करून त्यांना त्यातून बाहेर काढले होते. तेव्हापासून दहशतवादाशी संबंधित कोणत्याही घडामोडीत वर्धेचे नाव जुळले नव्हते. आज थेट एनआयएनेच छापा मारल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्धासोबतच हैदराबादमध्येही तीन ठिकाणी एनआयएने छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
इसिस हस्तकाची पत्नी जेरबंद :एनआयएचा वर्धेत छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 1:05 AM
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव नहनुमा बाशिद असे असून, ती हैदराबाद येथील रहिवासी होय. म्हसाळा येथे तिचे माहेर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तपास यंत्रणांनी नहनुमाच्या आईलाही विचारपूस करण्यासाठी ताब्यात ठेवले होते.
ठळक मुद्दे तीन वर्षांपासून होती वाँटेड