भिवापूर : चंद्रपूर येथील एका इसमाचा मृतदेह शुक्रवारी सकाळच्या सुमारास तास शिवारातील एका शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. आशितोष ध्रुवकुमार टंडन (४८) रा. चंद्रपूर असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय मार्गावरील तास शिवारातील एका शेतातील विहीरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. मात्र जास्त दिवस उलटल्यामुळे मृतदेह सडून व गळून पडला होता. त्याच्या अंगावरील कपड्याची तपासणी केली असता त्यात आधारकार्ड व एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक लिहिलेला आढळला. सदर क्रमांकावर फोन कळताच मृताची ओळख पटली. त्यानुसार घरगुती कारणामुळे मृत गत मे महिन्यात घरून निघून गेला. त्यानंतर शुक्रवारी भिवापूर लगतच्या शेतात मृतदेह आढळला. मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात राजेंद्र डहाके तपास करीत आहे.
चंद्रपूरच्या इसमाची भिवापुरात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:07 AM