नागपूर : गेल्या काही दिवसापासून फुटाळा तलावातील पाण्याच्या पातळीत सातत्याने घट हाेत आहे. याबाबत पर्यावरणवाद्यांकडून तलावाचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मागणी भूजल सर्वेक्षण व विकास एजन्सी(जीएसडीए) ला करण्यात आली हाेती. मात्र संस्थेने महापालिकेला पत्र पाठवीत स्वत:ला यापासून अलिप्त केले. त्यामुळे राज्यभरात कुठेही भूजल सर्वेक्षणाची जबाबदारी असलेल्या जीएसडीएसाठी नागपूर महाराष्ट्रात नाही का, असा सवाल पर्यावरण कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे.
फुटाळा तलावाच्या परिसरात प्रेक्षक गॅलरी तसेच मेट्राेसाठीच्या पार्किंग प्लाझा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळेच तलावाच्या जलस्तरात सातत्याने घट हाेत असून, याबाबत तांत्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी पर्यावरण कार्यकर्ते शरद पालीवाल यांनी भूजल सर्वेक्षण विभागाला केली हाेती. मात्र जीएसडीएने महापालिकेला पत्र पाठविले. तलावाच्या परिसरातील जलस्तराचा डेटा उपलब्ध नसल्याचे तसेच फुटाळा तलाव महापालिका क्षेत्रात माेडत असल्याने महापालिकेनेच तांत्रिक अभ्यास करावा व पर्यावरणवाद्यांच्या शंकेचे निरसन करावे, असे पत्र सादर केले. यावर पालीवाल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भूजल विभागाकडे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही भूजल स्रोताचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार आहेत. त्यांच्याकडे तज्ज्ञ मनुष्यबळ आहे, तांत्रिक साहित्य आहेत आणि सॅटेलाईट डेटा उपलब्ध आहे. जलस्तर कुठे किती आहे, कुठे घट हाेत आहे आणि का हाेत आहे, याचीच तपासणी करण्यासाठी शासन संस्थेवर काेट्यवधी रुपये खर्च करीत असते.
पालीवाल म्हणाले, एखाद्या ठिकाणी अशी ॲक्टीव्हीटी हाेत असेल तर त्याची तपासणी करून सत्यता बाहेर काढण्याचे अधिकार भूजल विभागाला आहेत. त्यामुळे त्यांनी फुटाळा तलावाबाबत चाैकशी करण्याची अपेक्षा हाेती. बांधकामामुळे फुटाळ्याचा ऐतिहासिक वारसा धाेक्यात आला आहे. जलस्तर घटत असल्याने शहरातील भूजलस्तर घटण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यापूर्वी मनपालाही विनंती केली आहे. मात्र त्यांच्याकडून काही केले जात नसल्याने जीएसडीएला विनंती केली. मात्र या संस्थेनेही भ्रमनिरास केल्याची टीका शरद पालीवाल यांनी केली.