लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात डेल्टा प्लस संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत.
(Isolation is now mandatory for a positive patient to avoid the risk of Delta Plus)
झोन आयुक्तांना यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. संबंधित झोनमधील पॉझिटिव्ह रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल झाला अथवा नाही, याबाबत त्यांना बारकाईने लक्ष ठेवायचे आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी डेल्टा प्लसचा धोका कायम आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो, ही शक्यता लक्षात घेता त्याच्यापासून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनीही पॉझिटिव्ह आल्यास स्वतःच याबाबत खबरदारी घ्यायची आहे. आयुक्तांच्या या आदेशानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गृहविलगीकरणात राहता येणार नाही. तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने संस्थात्मक विलगीकरणात आणि गरज भासल्यास रुग्णालयात दाखल व्हायचे आहे.
मनपाचे विलगीकरण केंद्र आमदार निवास येथे आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली सूतिकागृह रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल कॉलेज), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेयो)मध्ये उपचारासाठी भरती होऊ शकतात. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण खासगी रुग्णालयामध्येसुद्धा दाखल होऊ शकतात.