लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये बाधित पक्ष्यांसाठी आयसोलेशन वाॅर्ड सुरू करण्यात आला आहे. हा आयसोलेशन वाॅर्ड हॉस्पिटलपासून वेगळा असून त्या ठिकाणी पक्ष्यांवर उपचार केले जाणार आहेत.
मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पक्ष्यांची तपासणी आयसोलेशन वॉर्डमध्येच केली जाईल. त्यानंतर पुढील उपचारासाठीही त्यांना तिथेच ठेवले जाईल. सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि उपचारासाठी दाखल असलेल्या जखमी पक्ष्यांना तसेच प्राण्यांना या बाधित पक्ष्याकडून लागण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. बाधित पक्षी आढळल्यास महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही हाते यांनी कळविले आहे.
...
उबगी फार्मवरील कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील उबगी फार्मवर सुमारे २५० कोंबड्या मेल्याने खळबळ माजली आहे. डीजेमुळे चेंगरून व गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी, बर्ड फ्लूच्या साथीमुळे या कोंबड्यांना रोगाची लागण झाली होती का, अशी शंकाही उपस्थित होत आहे. त्यामुळे या मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्त मनीषा पुंडलिक यांनी दिली.