लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येतील विवादित स्थळी राममंदिर होते याचे भारतीय पुरातत्त्व विभागाला १९७६ साली केलेल्या पहिल्याच उत्खननात पुरावे सापडले होते. परंतु नव्वदीच्या दशकात डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी यासंदर्भात भ्रामक व खोटे दावे केले. त्यांच्या या खोटेपणामुळे समाजात गैरसमज पसरत गेले व अयोध्येचा मुद्दा चिघळला, असा आरोप भारतीय पुरातत्त्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के.के.मोहम्मद यांनी केले. ‘मंथन’तर्फे रविवारी आयोजित व्याख्यानादरम्यान चिटणवीस केंद्र येथे आयोजित ‘भारतीय मंदिरे : संशोधन व पुरातत्त्वीय निष्कर्ष’ या विषयावर ते बोलत होते.१९७६ साली तत्कालीन महासंचालक बी.बी.लाल यांच्या नेतृत्वात अयोध्येतील विवादित स्थळी उत्खनन व पाहणी झाली होती. त्या चमूमध्ये माझादेखील समावेश होता. संबंधित स्थळाची पाहणी केली असता तेथे अगोदर मंदिर होते याचे पुरावे स्पष्टपणे दिसून येत होते. १० ते १२ खांब हे मंदिरांचे होते. शिवाय तेथे अष्टमांगल्य चिन्ह असलेले कलशदेखील कोरलेले दिसून येत होते. परंतु अयोध्या मुद्दा तेव्हा इतका वादात नव्हता. मात्र १९९० च्या जवळपास काही डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी अयोध्येत मंदिर कधीच नव्हते व भारतीय पुरातत्त्व विभागालादेखील काहीच पुरावे मिळाले नाहीत, असे खोटे दावे केले होते. त्यांच्या या खोटेपणामुळे मुद्दा जास्त चिघळला, असे के.के.मोहम्मद यांनी सांगितले. २००३ साली झालेल्या उत्खननानंतर संबंधित स्थळी हिंदू देवदेवता व संस्कृतीशी निगडित २६६ प्रतिमा आढळून आल्या. डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खोटेपणा उघड झाल्यानंतर त्यांनी तेथे बौद्ध धम्म, जैन धर्म यांचे प्रार्थनास्थळ होते, असे दावे करणे सुरू केले.परंतु वैज्ञानिक अभ्यासातून सत्य समोर आले होते. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुराव्यांच्या आधारावर सर्वोत्तम निर्णय दिला आहे. मात्र काही लोक पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. अशा गोष्टींना पाठिंबा देणाऱ्या ओवैसीसारख्या राजकारण्यांना मुस्लिम जनताच एक दिवस दूर सारेल, असेदेखील ते म्हणाले. यावेळी सतीश सारडा हेदेखील उपस्थित होते.भूतकाळातील चुका स्वीकारायलाच हव्यातभारतामध्ये मुस्लिम शासकांकडून भूतकाळात काही चुका निश्चित झाल्या. मंदिरे पाडण्यात आली. यात गझनी, घोरी यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्याच चुकांचा स्वीकार करायलाच हवा. मात्र या चुकांचे स्पष्टीकरण देण्याचा अनाठायी प्रयत्न काही लोक करतात. ती बाब उचित नसल्याचे मत के.के.मोहम्मद यांनी व्यक्त केले.हिंदू बहुसंख्य असल्यामुळेच धर्मनिरपेक्षता टिकूनयावेळी के.के.मोहम्मद यांनी धर्मनिरपेक्षतेवरदेखील आपले मत व्यक्त केले. धर्माच्या आधारावर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. आपल्या देशाने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला. काही लोकांनी समाजात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतात हिंदू बहुसंख्य प्रमाणात आहेत. त्यामुळेच देशात धर्मनिरपेक्षता टिकून आहे, असे मोहम्मद म्हणाले.अन् डाकू म्हणाले हा चमत्कारचके.के.मोहम्मद यांनी मध्य प्रदेशमधील बटेश्वर येथील ऐतिहासिक मंदिरांचे उत्खनन व त्यांची पुनर्रचना यावरदेखील प्रकाश टाकला. चंबळ खोºयात डाकूंचे साम्राज्य होते. त्यांना विनंती करुन भारतीय पुरातत्त्व विभागाची चमू या कामाला लागली होती. मंदिरे अक्षरश: उद्ध्वस्त झाली होती व त्यांचे अवशेष इतस्तत: विखुरलेले होते.मात्र अखंड प्रयत्नानंतर संपूर्ण मंदिरे जुन्या स्वरुपात उभी झाली. डाकू ज्यावेळी तेथे परत आले तेव्हा खरोखरच हा चमत्कारच झाला असल्याची त्यांची प्रतिक्रिया होती, असे मोहम्मद यांनी सांगितले.
डाव्या इतिहासकारांमुळेच अयोध्येचा मुद्दा चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:19 PM
डाव्या इतिहासकारांच्या खोटेपणामुळे समाजात गैरसमज पसरत गेले व अयोध्येचा मुद्दा चिघळला, असा आरोप भारतीय पुरातत्त्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के.के.मोहम्मद यांनी केले.
ठळक मुद्दे‘मंथन’च्या व्याख्यानमालेत टाकला अयोध्येच्या उत्खननावर प्रकाश