लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा हवाला देऊन नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)च्या प्लानिंग अॅथारिटीचे अधिकार काढून महापालिकेच्या नगररचना विभागाला देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. परंतु पुन्हा एकदा नागरिकांशी निगडित अपुर्ण कामे व ले-आऊटच्या विकासासाठी प्रन्यासला पुन्हा नियोजन प्राधिकरणाच्या रुपाने मंजुरी प्रदान करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या सत्तारुढ भाजपासोबत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन नासुप्रला पुनर्जिवीत केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. आगामी २७ जानेवारीला महापालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. सूत्रांनुसार महापौर संदीप जोशी यांनी संबंधित विषयासाठी विशेष सभा घेण्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. त्यानंतर घाईगडबडीत विषय पत्रिका काढण्यात आली. नियमानुसार विशेष सभेच्या तीन दिवसांपूर्वी विषय पत्रिका काढणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस चर्चेसाठी ठरला. नासुप्रचे अधिकार काढण्याचा आदेश मागील सरकारने काढला होता. परंतु कर्मचाऱ्यांचे समायोजन, ले-आऊट, नासुप्रच्या मालकीची संपत्ती महापालिकेच्या सुपूर्द करण्याचा आदेश जारी झाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाला केवळ नासुप्रच्या अधीन असलेल्या संपत्तीचा नकाशा मंजुरीचे अधिकार मिळाले. नासुप्रमध्ये २ लाखाच्या जवळपास फाईल आहेत. परंतु ५७०० फाईलच महापालिकेत पोहोचल्या. भाजपाने मागील निवडणुकीत नासुप्रच्या बरखास्तीचे श्रेय लाटले. परंतु अपूर्ण हस्तांतरणामुळे चार महिन्यांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर येताच डॉ. नितीन राऊत यांना पालकमंत्री करण्यात आले. त्यांनी पत्र लिहून मनपातर्फे गुंठेवारी ले-आऊटच्या नियमितीकरणाचे काम असमाधानकारक असल्याचे सांगितले.चर्चेमुळे कुणाचा होणार फायदाकाही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आमसभेत भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी नासुप्रच्या फाईल आल्या नसल्याचा मुद्दा उचलला. महापौर संदीप जोशी यांनी गुंठेवारी प्लॉटसाठी वेगळ्या कक्षाची घोषणा केली होती. नगररचना विभागातर्फे पत्र जारी होताच भाजपात खळबळ उडाली. विशेष सभेतील चर्चेतून काय मिळेल हा मोठा प्रश्न आहे. भाजपाचे नेते व नगरसेवक नासुप्रला पुनर्जिवित करण्याच्या बाजूने दिसले. सूत्रानुसार चर्चा आयोजित करून भाजपा कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नागरिकांच्या विरोधात असल्याचे दाखवू पाहत आहे. विशेष सभेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्वागत नगरसेवक करू शकतात.
नासुप्रला पुनर्जिवीत करण्याचा मुद्दा : भाजपात वाढली अस्वस्थता, बोलावली विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:31 AM