नागपूर : ‘डेल्टा प्लस’चे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, यापुढे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये राहता येणार नाही. एक तर हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात राहावे लागणार आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे मात्र कोरोना चाचण्यांची संख्या कमी होऊन रुग्ण वाढण्याची व परिणामी प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरली. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूच्या संख्येने उच्चांक गाठला. जानेवारी ते जून यादरम्यान नागपूर जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार २८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर, ५ हजार ७५ रुग्णांचे जीव गेले. जुलै महिन्यापासून रुग्णसंख्येत मोठी घट आली. यामुळे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या १० च्या आत आहे, तर मृत्यूची संख्या स्थिर आहे. परंतु सोमवारी शहरातील पाच कोरोनाबाधितांच्या ‘जीनोम सिक्वेंसिंग’च्या अहवालात ‘डेल्टा व्हेरियंट’ हा नवीन प्रकार आढळून आला. या पार्श्वभूमीवर यापुढे कुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यापासून संसर्ग पसरू होऊ नये, याची खबरदारी म्हणून कोरोना बाधिताला होम आयसोलेशन म्हणजे गृह विलगीकरणात राहता येणार नसल्याचा निर्णय मनपाने घेतला. रुग्णाला आमदार निवासातील कोविड केअर सेंटर किंवा शासकीय किंवा खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागणार आहे. परंतु या निर्णयामुळे अनेक संशयित रुग्ण तपासणीसाठीच पुढे येणार नसल्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- संशयित रुग्णही चाचणी करण्यास घाबरणार - डॉ. देशमुख ()
प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, आतापर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग कमी झाला असे दिसून आले नाही. बाहेरील देशातही असे होत नाही. संस्थात्मक विलगीकरणात हृदयरोग किंवा मधुमेहाच्या रुग्णांची केअर होतेच असेही नाही. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या दृष्टिकोनातून ‘होम आयसोलेशन’ मोठा आधार ठरला होता. परंतु आता बदललेल्या निर्णयामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण चाचणी करण्यास घाबरतील. याचा धोका होण्याची शक्यताच अधिक आहे.
- ‘डेल्टा प्लस’पासून धोका नाही - डॉ. शिंदे ()
प्रसिद्ध संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले,‘डेल्टा प्लस’च्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला, याचे अद्याप एकही उदाहरण नाही. उलट दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला ‘डेल्टा’ हा विषाणूचा प्रकारच अधिक घातक ठरला. यामुळे ‘डेल्टा प्लस’पासून धोका आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. त्या धर्तीवर लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ‘होम आयसोलेशन’ नाकारल्यास त्यांच्या घरातील लोकच चाचणीसाठी समोर येणार नाही. आजार वाढल्यावरच ते रुग्णालयात येतील. परिणामी, संसर्ग वाढण्याची भीती आहे.
- मनपाचा निर्णय योग्यच - डॉ. सरनाईक ()
प्रसिद्ध श्वसन रोगतज्ज्ञ व कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रवींद्र सरनाईक म्हणाले, दोन महिन्यापूर्वीच टास्क फोर्सच्या सदस्यांनी प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला दिला होता. अंमलबजावणी आता होत असली तरी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. सध्या १० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरण किंवा रुग्णालयात ठेवल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. होम आयसोलेशनमध्ये कितीही काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका राहतोच. विशेषत: दुसऱ्या लाटेत कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाल्याचे दिसून आले. यामुळे मनपाचा हा निर्णय योग्यच आहे.