निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर : ऑक्टाेबरच्या शेवटच्या दिवसात नागपूरसह विदर्भात गडगडाटीसह किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज हाेता, पण वेधशाळेचा हा अंदाजही फाेल ठरला. उलट दिवस रात्रीचे तापमान माेठ्या फरकाने उसळले असून शरीरातून घाम काढणाऱ्या उकाड्याने नागरिकांना त्रासवून साेडले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टाेबर हीटच्या उकाड्याने नागपूरकरांना अक्षरश: हैरान केले आहे. त्यामुळे कधी एकदा थंडी सुरू हाेते, असे झाले आहे. दरम्यान नागपूरसह विदर्भात २९ ते ३१ ऑक्टाेबरदरम्यान विजा व गडगडाटासह हलका पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली हाेती. मात्र पावसाची कुठलीही परिस्थिती निर्माण झाली नाही. उलट तापमानाने पुन्हा उसळी घेतली.
नागपूरचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २.४ अंशाने वाढून ३४.७ अंशावर गेले. दुसरीकडे रात्रीचा पारा सुद्धा सरासरीपेक्षा तब्बल ५.५ अंशाने उसळला व २३.१ अंशावर पाेहचला आहे. त्यामुळे गारवा वाढण्याची अपेक्षा असलेल्या नागरिकांना उन्हाचे चटके व उकाड्याचा सामना करावा लागताे आहे. दुसरीकडे विदर्भातील इतर जिल्ह्यातही तापमान जणू परीक्षा घेत आहे. ब्रम्हपुरी ३६.७ अंश, अमरावती ३६ अंश तर अकाेला ३५.९ अंशावर वधारले आहे. अमरावती, ब्रम्हपुरी सरासरीच्या ४.६ अंश वर आणि अकाेला २.६ अंशाने वर आहे. वर्ध्याचे कमाल तापमानही ३५ अंशावर उसळले आहे. इतर सर्व जिल्ह्यात रात्रीचा पारा २० ते २२ अंशाच्या रेंजमध्ये आहे.
दरम्यान विदर्भात १ नाेव्हेंबरपासून तर महाराष्ट्रात ५ नाेव्हेंबरपासून थंडी सुरू हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तापमान वाढीची स्थिती पाहता विदर्भात पुढच्या दाेन दिवसात थंडीची चाहुल लागेल, असे जाणवत नाही.