नागपूर : येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील नवजात शिशूंच्या वॉर्ड क्रमांक १ मधील सेंट्रलाईज ऑक्सिजन सप्लाय सिस्टिम ऑपरेट करण्यासाठी प्रशिक्षित पुरुष कर्मचारी नाहीत. यामुळे येथील उपचार सेवा प्रभावित होत असल्याची आणि येथील कनेक्शन खराब असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामुळे जोखीम वाढली असून कर्मचाऱ्यांनी खुद्द अधिष्ठात्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. अशीच समस्या लहान मुलांच्या वॉर्ड क्रमांक ३ मध्ये असली तरी प्रशासन मात्र ही अव्यवस्था मान्य करायला तयार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड १ मधील या कामाची जबाबदारी एका महिला महिला अटेंडन्ट कर्मचाऱ्याकडे आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यासाठी व संपल्यावर बदलण्यासाठी प्रशिक्षित पुरुष कर्मचाऱ्याची आवश्यकता असते. कारण हे सिलिंडर मोठे आणि फारच वजनदार असते. दर दोन तासांनी ते बदलावे लागते. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या बाळांना ते लावले जाते. ऑक्सिजन संपण्याच्या १० मिनिटांपूर्वी अलार्म वाजतो. यादरम्यान ते बदलायचे असते. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नवजात बाळांची जोखीम वाढली आहे. प्राप्त माहितीनुसार, ऑक्सिजनच्या चुड्या खराब झाल्या आहेत. यामुळे अनेकदा सिलिंडर लिक होते. दोन दिवसापूर्वी असाच प्रकार घडला होता. सोमवारी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून वाॅर्डातील कर्मचाऱ्यांनी ही समस्या अधिष्ठात्यांना सांगूृन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली.
...
कोट
अडचण आल्यावर तातडीने दुरुस्ती केली जाते. संबंधित व्यक्तीला यासंदर्भात सूचना दिली आहे. विषय वाढविण्याऐवजी संबंधित व्यक्तीची मदत घ्यायला हवी. अटेंडन्ट किंवा उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तीच्या मदतीने सप्लाय बदलण्यासाठी मदत घ्यावी, असेही पत्र देऊन कळविले आहे. क्षेत्रीय कार्यालयालाही कळविले आहे. त्यांनाही कॉल करून बोलावले जाऊ शकते. या लहान कामासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणे शक्य नाही. तसा आदेशही नाही. वॉर्डात कसलीही अडचण नाही, उगीचच विषय वाढविला जात आहे.
- डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता मेयो