नागपूर : कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. विशेषत: ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना लॅपटॉप, मोबाइलची सवय लागली आहे. मोबाइलसारख्या गॅझेटच्या वापरासह मुलांचा ‘स्क्रीनटाइम’ खूप वाढलाय. याचे मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी फिजिकल शाळा सुरू होणे आवश्यक आहे, असा सूर बालरोग तज्ज्ञाचा होता.
‘अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूर शाखेचा रविवारी पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित परिषदेत बहुसंख्य बालरोग तज्ज्ञांनी मुलांची शाळा सुरू होण्यावर भर दिला. यावेळी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.विजय धोटे यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ.पंकज अग्रवाल यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे पुढील वर्षी होणारे अध्यक्ष डॉ.रमेश कुमार आर., उपाध्यक्ष डॉ.जयंत उपाध्याय, डॉ.जयंत कुलकर्णी उपस्थित होते. सोहळ्याला डॉ.शुभदा खिरवाडकर, डॉ.मुस्तफा अली, डॉ.संजय पाखमोडे, डॉ.संजय देशमुख, डॉ.योगेश पापडे, डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
- प्रतिबंधक लसीसाठी १० महिन्यांचा कालावधी
सध्या हेल्थ वर्कर व फ्रंट लाइन वर्करला कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सामान्य नागरिक अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. लहान मुलांच्या लसीकरणाच्या मानवी चाचणीला आता कुठे सुरुवात झाली आहे. यामुळे लस येण्यास साधारण १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.
-शालेय वयोगटातील ८० टक्के मुलांची लठ्ठपणाकडे वाटचाल
बंद झालेले मैदानी खेळ, एकाच ठिकाणी बसून राहण्याची लागलेली सवय, जंक फूडचे वाढलेले प्रमाण, यामुळे शालेय वयोगटातील जवळपास ८० टक्के मुलांची लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्य वजनापेक्षा ८ किलोपर्यंत वजन वाढलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. याला आवर घालणे पुढे कठीण जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी वर्तविला.
-मुलांमध्ये मानसिक आजार बळावले
कोरोना काळात मुले घरीच होती. अजूनही काही मुले घरातच आहेत. सततचे टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइलचा मनावर परिणाम होत आहे. मित्रांसोबत खेळणे, शाळेत जाणे बंद झाल्याने ताण वाढला आहे. २४ तास मुले घरीच राहत असल्याने, त्यांच्यावर अनेक बंधने आली आहेत, यातून मानसिक ताण वाढल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.