श्वानाच्या त्रासापायी त्यांच्यावर घरच साेडण्याची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 11:24 PM2021-06-18T23:24:48+5:302021-06-18T23:25:14+5:30
Dog's turn to harass them माणसांकडून श्वानांवर अत्याचार झाला तर त्याविराेधात कारवाई हाेते पण श्वानांचा माणसांना त्रास झाला तर? त्रिमूर्तीनगर येथे राहणाऱ्या दाेन वृद्ध महिला सध्या हाच त्रास भाेगत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणसांकडून श्वानांवर अत्याचार झाला तर त्याविराेधात कारवाई हाेते पण श्वानांचा माणसांना त्रास झाला तर? त्रिमूर्तीनगर येथे राहणाऱ्या दाेन वृद्ध महिला सध्या हाच त्रास भाेगत आहेत. शेजारी राहणाऱ्यांच्या घरातील श्वानाच्या सततच्या भुंकण्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागताे आहे. महापालिका, व्हेटरनरी विभाग, पाेलीस स्टेशन ते डीसीपी कार्यालयापर्यंत तक्रार करून झाली पण काहीच झाले नाही. आता हा खटला हायकाेर्टात पाेहचला आहे. येथूनही निराशा मिळाली तर शेवटी घरच साेडावे लागेल, अशी व्यथा या महिलांनी व्यक्त केली आहे.
मालती विनायक रहागुडे (६५) व नलिनी रहागुडे (६८) या दाेन बहिणी गेडाम ले-आऊट, त्रिमूर्तीनगर येथे राहतात. त्यांच्यासाेबत आनंद रहागुडे हा भाचाही राहताे. त्यांच्या शेजारच्या कुटुंबाकडे जर्मन शेफर्ड हा विदेशी प्रजातीचा श्वान आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा श्वान रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर भुंकत असताे. त्याचे हे भुंकणे सकाळपासून रात्री १०, ११ वाजतापर्यंत सतत सुरू असते. मालती यांना मायग्रेनचा तर बहिणीला एपीलेप्सीचा त्रास आहे. त्यांनी आपल्या आजाराचे कारण देत शेजाऱ्यांना श्वानाच्या भुंकण्यावर आवर घालण्याची विनंती केली पण उलट त्यांनाच ऐकावे लागले. मग त्यांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले.
आधी महापालिकेचा पशु संवर्धन विभाग, मग तेव्हा आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांना तक्रार दिली. पुढे प्रतापनगर पाेलीस स्टेशन व नंतर डीसीपी कार्यालयही गाठले. पाेलिसांनी शेजाऱ्यांना लेखी समन्स बजावले पण पुढे काहीच झाले नाही. या काळात काही दिवस घर साेडून त्या बेसा भागात भाड्यानेही राहिल्या. आता त्या परत आल्या आहेत व न्यायालयात वकिलांमार्फत याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येथेही काही झाले नाही तर शेवटी घरच विकावे लागणार असून तशी तयारीही सुरू केल्याची व्यथा मालती रहागुडे यांनी व्यक्त केली आहे.
अनधिकृत ब्रिडिंग व विक्रीमुळे समस्या
प्राणीप्रेमी स्मिता मिरे यांच्या मते अशा त्रासाबाबत कारवाईचा नियम नाही. मात्र पाेलिसांत तक्रार केल्यानंतर श्वानाच्या भुंकणे थांबविण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याबाबत मालकावर दबाव आणला जाऊ शकताे. विदेशी प्रजातीचे श्वान विकत घेणे व पाळण्याबाबत काही नियम आहेत व अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ती झाली की नाही, याची तपासणी केली जाऊ शकते. विदेशी प्रजातींचे अनधिकृत ब्रिडिंग व विक्रीमुळे या समस्या निर्माण हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.