हिंगणा : शिक्षकाशिवाय प्रगतिशील समाजाची निर्मिती शक्य नाही. परिस्थिती कशीही असो कितीही संकटे येवो आम्ही ज्ञानदानाचे कार्य थांबविणार नाही, या संकल्पनेतून शिक्षकांनी कोविड काळात केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले.
श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेने हिंगणा तालुक्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केदार यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
हिंगणा एमआयडीसी येथील एमआयए क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रमेशचंद्र बंग होते. माजी आमदार विजय घोडमारे, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, राजाभाऊ टाकसाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला बोंढारे याप्रसंगी उपस्थित होते. हिंगणा तालुक्यातील शिक्षकांसाठी दोन गटात ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेत्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. प्रास्ताविक जि.प. सदस्य दिनेश बंग यांनी केले.