नागपूर -पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे सर्वासामान्य नागरीक त्रस्त झाला आहे. यामुद्द्यावरून विरोधकही सरकारवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. यातच आता योग गुरू बाबा रामदेव यांनीही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसंदर्भात भाष्य केले आहे. मात्र, या मुद्द्यावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा बचाव केला आहे.
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सामाजिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेसाठी स्वामी रामदेव यांचे आज नागपुरात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली.
बाबा रामदेव म्हणाले, "जर कच्च्या तेलाच्या किंमतीच्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल विकले गेले तर दोन्ही स्वस्त होतील. पण इंधनांवर टॅक्स लावला जातो. सरकार तसेच देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी हे आवश्यक आहे. यामुळेच सरकारला टॅक्स हटविणे अशक्य होत आहे. मात्र, कधी ना कधी हा टॅक्स नक्कीच हटेल आणि पेट्रोल-डीझेल स्वस्त होईल."
बॉलिवूडमधील नशेचा कचरा समाजासाठी घातक -यावेळी बाबा रामदेव यांनी ड्रग्स आणि बॉलिवूड वरही भाष्य केले. बॉलिवूडमध्ये नशेचा जो कचरा झाला आहे, तो समाजासाठी घातक असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एवढेचन नाही, तर हा कचरा सर्वांनी मिळून साफ करायला हवा, असेही रामदेव यावेळी म्हणाले. सध्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि बॉलीवूडची उद्योन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे यांची ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -- बॉलिवूडमधील नशेचा कचरा समाजासाठी घातक;सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज- रामदेवबाबा- भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात; योगगुरू रामदेवबाबा