नागपूर : केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. कितीही ताकदवान माणसाचे वजन सरासरी १०० किलोच्या वर नसते. मग एखाद्याला त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलायला लावणे अमानवीय असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू, तांदूळ, सोयाबीनच्या पोत्याचे वजन ५० किलो असते. अजूनही धानाचे पोते ७० किलोचेच आहे.
७० किलोचे पोतेही उचलावे लागते
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पोत्याचे वजन साधारण ५० किलोचे असते. त्यात सोयाबीन, हरभरा, तूर आदींचे पोते ५० किलो तर ७० किलोचे धानाचे पाेते अजूनही उचलावे लागते.
पाठीचे हाड मोडू शकते...
पाठीच्या कण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता होय. सतत जास्त वजनाचे पोते पाठीवर सतत वाहून नेल्याने हळूहळू नैसर्गिक लवचिकता कमी झाल्याने स्नायू आखडतात. प्रसंगी पाठीचे हाड मोडू शकते. हाताच्या सर्व हालचाली करताना खांदे आणि पाठ स्थिर असते. सतत एकाच स्थितीत राहिल्याने मान, पाठीचा कणा स्टिफ बनतो. त्यातून मानदुखी, कंबरदुखीला सुरुवात होते. अशा वेळी पाठ मोकळी असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये हमालाने पाठीवर कमी वजन उचलणे आवश्यक आहे.
आता पोत्याचे वजन ५० किलो
पूर्वी गहू, तांदूळ आणि अन्य कृषिमालाचे १०० किलोचे पोते राहायचे. जास्त पोते वाहून नेणे त्यावेळी कठीण होते. पण जास्त मजुरी मिळत असल्यामुळे न्यावे लागायचे. पण आता बाजार समितीत सर्व मालाचे पोते ५० किलोचे असते.
- शालिक देवासे, कामगार.
आधीच्या तुलनेत आता कृषिमालाच्या पोत्याचे वजन कमी झाले आहे. गहू, तांदूळ, सोयाबीनचे पोते आता ५० किलोचे झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे मजुरीही कमी झाली आहे. आताही तेवढ्याच वजनाची जास्त पोती वजनावर न्यावी लागतात.
- छबलू उके, कामगार.