नागपूर :कर हे केवळ सरकारच्या कमाईचे स्रोत नसून इच्छित सामाजिक-आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्रभावी साधनदेखील आहेत. कर संकलन वाढविण्याची गरज आहे, परंतु ते पारदर्शक आणि वापरकर्ता अनुकूल पद्धतीने केले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य करदात्यालाही वेळेवर कर भरता यावा यासाठी करप्रणाली अतिशय सोपी व सुलभ झाली पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. भारतीय महसूल सेवेच्या ७४ व्या तुकडीचा समारोप समारंभ शुक्रवारी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे. बी. महापात्रा आणि एनएडीटीचे प्रधान महासंचालक प्रवीण कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांनी देशात स्थिर, वापरकर्ता-अनुकूल आणि पारदर्शक कर व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न तीव्र करण्याची आवश्यकता आहे. असा पुढाकार घेत अधिकाऱ्यांनी भारताला विकसित, समृद्ध आणि आनंदी समाज बनविण्यासाठी काम करावे. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना आणि अडचणींना न घाबरता सामोरे जावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. तुम्ही नवीन कल्पनांना ग्रहणक्षम आणि ऐकण्यासाठी आणि आत्मसात करण्यास तयार असले पाहिजे, असेही सांगितले.
नवल कुमार जैन यांना सात सुवर्णपदके
या समारंभात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रशिक्षणादरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदक देऊन सन्मानित केले.
नवल कुमार जैन या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना अर्थमंत्री सुवर्ण पदकासह विविध विषयातील प्रावीण्यासाठी सात सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले.