नागपूर : आयसीयूमधील गंभीर रुग्ण केवळ यांत्रिक जीवनावश्यक प्रणालीच्या साहाय्याने जगत असेल, त्याचा मृत्यू निश्चित असेल तर त्याला कमीतकमी वेदना व्हाव्यात, त्याचा मृत्यू नातेवाइकांच्या सानिध्यात व्हावा; ही ‘गुड डेथ’ची संकल्पना आहे. मात्र, रुग्णाच्या नातेवाइकांना हे सांगणे डॉक्टरांसमोर आव्हान असल्याचे असे मत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईच्या क्रिटिकल विभागाचे प्रमुख डॉ. जे. व्ही. दिवटिया यांनी येथे व्यक्त केले.
‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन’द्वारे (आयएससीसीएम) दुसऱ्या ‘इंटरनॅशनल क्रिटिकल केअर अपडेट’ परिषदेत’ ते ‘बॅलेन्सिंग मेडिसीन इथिक्स ॲण्ड फिलॉसॉफी ऑफ डेथ’ या विषयावर ते बोलत होते. रविवारी या परिषदेचा समारोप झाला. यावेळी ‘आयसीसीसीएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेश मिश्रा, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल उपस्थित होते.
-ज्येष्ठांचे लसीकरण आवश्यक
डॉ. मिश्रा म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यांनी लसीकरणाकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जेणेकरून ते प्रादुर्भाव टाळून पुढे ‘सेप्सिस’सारख्या जीवघेण्या परिस्थितीपासून दूर राहू शकतील. ज्येष्ठ इंटेन्सिव्हिस्ट डॉ. निखिल बालंखे म्हणाले की, ‘आयसीयू’ हा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकविते.
-आंतरराष्ट्रीय परिषदेतून जागतिक स्तराचे ज्ञान
डॉ. जयस्वाल म्हणाले, ‘इंटरनॅशनल क्रिटिकल केअर अपडेट’ परिषदेला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच भारतभरातून डॉक्टरांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शविली. अशा परिषदेमुळे जागतिक स्तराचे ज्ञान मिळते. नवे आजार व उपचारांची माहिती मिळते. परिणामी, रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. डॉ. दीपक जेसवानी यांनी आरोग्य क्षेत्रात भारत प्रगती करत असून पाश्चात्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे मत मांडले.