नागपूर : महायुती सरकारतर्फे गणपतीपूर्वी दीड कोटी कुटुंबांना आनंदाचा शीधा देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, गणेशोत्सव संपत आला तरी लाडक्या बहिणींना शिधा मिळालेला नाही. कीटमध्ये देण्यात आलेल्या चना डाळीत भेसळ आहे, साखर पीठासारखी आहे, तर तेलाचे पाकिटही कमी वजनाचे आहे. बाजारत २५० रुपयांनी मिळणारी ही कीट पुरवठादाराकडून ३४८ रुपयांना घेण्यात आली आहे. या माध्यमातून पुरवठादाराकडून कोट्यवधींचे घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत आनंदाचा शिधा मध्ये मिळणारी चना दाळ, साखर व तेलाचे पॉकेट दाखविले. चना डाळीत वटाळा डाळीची भेसळ केली आहे. पाकिटावर बॅच क्रमांकांची नोंद नाही. एक किलो तेलाचे पाकीट ९१७ ग्रॅम वजनाचे असावे पण प्रत्यक्षात ते ९०० ग्रॅमचे आहे. साखर खडीदार नाही तर पीठ झालेली आहे. राज्यातील १ कोटी ५६ लाख ३ हजार ३२८ रेशन कार्ड धारकांना हा शीधा पुरवठा करण्यासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. ला कंत्राट देण्यात आला. पण प्रत्यक्षात या पुरवठादाराने शीधा पोहचविलेला नाही. हा शिधा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे राज्यभरातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याचे नमूने घ्यावे. संबंधित नमुने प्रयोग शाळेत तपासावे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून या प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी लोंढे यांनी केली. गणेशोत्सवात शिधा वाटप न करून सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करीत असल्याचा आरोप करीत हा आनंदाचा शिधा नसून मलिदा असल्याची टीका लोंढे यांनी केली.