राकेश घानोडे
नागपूर : उच्च शिक्षित पत्नीने नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, त्याकरिता पतीकडे आग्रह धरणे, ही कृती क्रूरता नव्हे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद केले. सुशिक्षित व्यक्तीने नोकरी करण्याची इच्छा बाळगण्यात काहीच अनैसर्गिक नाही. अशा कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग करावासा वाटतोच, असेदेखील न्यायालय पुढे म्हणाले.
या प्रकरणातील पती बुलडाणा, तर पत्नी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी, तर पत्नीने पतीसोबत नांदण्याचा अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने पतीची याचिका खारीज केली व पत्नीची याचिका मंजूर केली. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या अपीलवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पतीने पत्नी क्रूरतापूर्ण वागणूक देत असल्याचा आरोप केला. पत्नी इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवीधर आहे. त्यामुळे तिची नोकरी करण्याची इच्छा आहे. ती नोकरी शोधण्यासाठी सतत छळ करते. मुलाला जन्म दिल्यानंतर तिने शिकवणी वर्ग सुरू करण्याचा आग्रह धरला. त्याकरिता दुसऱ्या शहरात स्थानांतरित व्हायला लावले. परंतु, पुढे तिने मूल लहान असल्यामुळे शिकवणी वर्ग सुरू केले नाही, असे पतीचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने पतीचे हे मुद्दे निरर्थक व आधारहीन ठरवत वरील निरीक्षण नमूद केले.
वेगळे राहणे विभक्तता नव्हे
पत्नी कोणतेही ठोस कारण नसताना २ मे २००४ रोजी माहेरी निघून गेली. त्यानंतर तिला अनेकदा परत बोलावले, पण काहीच फायदा झाला नाही, असा आरोपही पतीने केला होता. त्याचा हा आरोपसुद्धा निराधार ठरला. त्याने २००४ ते २०१२ पर्यंत पत्नीला भेटण्याचा प्रयत्नच केला नाही. पत्नीला नोटीस पाठविली नाही. पती व त्याची बहीण चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे सासरचे घर सोडले, अशी माहिती पत्नीने न्यायालयाला दिली. न्यायालयाने हा आरोप लक्षात घेता अशा वातावरणात कोणतीही महिला सासरी राहू शकत नाही, असे स्पष्ट केले, तसेच पत्नी वेगळी राहत आहे, याचा अर्थ ती विभक्त झाली, असा होत नाही, याकडे लक्ष वेधले.
बाळंतपण : सर्व अधिकार महिलेलापत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती, पण तिने न विचारता गर्भपात केला, असा आरोप पतीने केला होता. न्यायालयाने तो आरोप चुकीचा ठरवला. बाळाला जन्म द्यायचा किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार केवळ महिलेला आहे. महिलेवर बाळाला जन्म देण्यासाठी बळजबरी करता येत नाही, असे न्यायालयाने सांगितले.
हिंदू समाजामध्ये विवाह हा संस्कार
लग्नाच्या गाठी देवाने बांधलेल्या असतात व लग्नामुळे दोन आत्म्यांचे मिलन होते, असे म्हटले जाते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये प्रेमाचे नवीन नाते स्थापित होते. हिंदू समाजामध्ये विवाहाला संस्कार समजले जाते. असे असले तरी अनेकदा विविध कारणांमुळे विवाह बंधने शिथिल होतात. हे प्रकरण याचे एक चांगले उदाहरण आहे, असे मतही न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले.