नागपूर : आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे यासंदर्भात सगळे अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. अध्यक्षांवर कोणी दबाव आणत असेल तर ‘हे फ्री ॲण्ड फेयर’ न्यायाने होणार नाही. विधानसभा अध्यक्ष स्वतः निष्णात वकील आहेत. जे संविधानात आहे, जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यानुसार योग्य सुनावणी घेऊन योग्य वेळेत ते निर्णय देतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी नागपुरात फडणवीस यांनी विविध आढावा बैठका घेतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, शरद पवार आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का ? आता जर पवार साहेबांनी भाजपला नैतिकता शिकवण्याचे ठरवले तर इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे गेले इथपासून सुरुवात होईल. त्यामुळे जाऊ द्या, ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, फार लक्ष द्यायचे नसते, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा उद्धव ठाकरे यांनाही अधिकार नाही. ते मोदींचे फोटो लावून निवडून आले. निवडून आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीकरिता विचार सोडला, युती सोडली पक्ष सोडला. ते कुठल्या नाकाने नैतिकता सांगतात. हे मला समजत नाही. त्यांना वाटत असेल निकाल त्यांच्या बाजूने आला तर त्यांनी ढोल बडवावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.