अनुप कुमार : विदर्भ विकास मंडळाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. विदर्भ विकास मंडळाची बैठक विभागीय आयुक्त, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सूचना करण्यात आल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने विविध पूरक व्यवसायांचा उल्लेख करून विभागीय आयुक्तांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाची माहिती दिली. या अभियानाची पूर्वतयारी तसेच संबंधितांना प्रशिक्षण या अनुषंगाने आजवर झालेल्या कार्यवाहीचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी तज्ज्ञ सदस्य अॅड. मधुकर किंमतकर, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. आनंद बंग, डॉ. किशोर मोघे, विदर्भ विकास मंडळाच्या सचिव डॉ. निरुपमा डांगे, सहायक संचालक अ. रा. देशमुख, उपायुक्त पी. एम. घाटे उपस्थित होते.मानव व वन्यप्राणी यांच्यातील होणाऱ्या संघर्षाला आळा बसावा, याकरिता उपाययोजना सुचविताना अनुप कुमार म्हणाले की, संरक्षित क्षेत्रातील वाघांची संख्या जास्त झाल्यानंतर काही वाघांचे दुसऱ्या संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण करावे, विदर्भ विभागात संरक्षित वनक्षेत्रांचे एकत्रीकरण करण्यात यावे. विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत ‘एनआरसीसी’ नागपूर संस्थेकडून अहवाल अपेक्षित आहे. या संस्थेने हे काम जलदगतीने पूर्ण करावे, यासाठी शासनस्तरावरून सूचना देण्यात याव्यात अशी विनंती आपण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत विदर्भातील विकासाची योजना तयार करण्यासंदर्भातील अहवाल डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी दिली .
शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक
By admin | Published: June 29, 2017 2:34 AM