लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. कारण सामाजिक वातावरणच गढूळ झाले आहे. दारुच्या नावावर राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही, याला समाजातील प्रत्येक घटकच जबाबदार आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.सी.मो. झाडे फाऊंडेशन तर्फे विशेष कार्य पुरस्काराचे वितरण बुधवारी दाभा येथील श्री सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रात झाले. तसेच या केंद्राच्या वातानुकूलीत वास्तुचे उद्घाटन गिरीश गांधी यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी, शुभदा देशमुख तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सर्वोदयी विचारवंत अॅड. मा.म. गडकरी व सी.मो. झाडे फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की, दारुबंदी, व्यसनमुक्ती बरोबरच आता अस्तीत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने २०१९ हे वर्ष सरताना एनआरसी, सीएए सारखे कायदे करून लोकांना अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नोटाबंदीमध्ये जसे रांगेत लागले, तसे रांगेत लागावे लागणार आहे. आज आदिवासी, भटके विमुक्तांजवळ आपले अस्तीत्व असल्याचे १९७१ पुर्वीचे दाखल मिळणे शक्य नाही. त्यामुळे हे कायदे दारुबंदी, व्यसनमुक्ती पेक्षा जास्त घातक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे डॉ. गोविंद समर्थ दिव्यांग सेवा कार्य पुरस्कार छबन अंजनकर, मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार लता राजपुत, ना.बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार नरेंद्र पाटील, सी.मो. झाडे पत्रकारीता पुरस्कार प्रमोद काळबांडे, डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. प्रमोद पोतदार यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर श्री सत्यनारायण नुवाल गुरुकुल केंद्राला मदत करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे यांनी केले.
संस्काराचे बीज समाजात रुजविणे गरजेचे आहे : गिरीश गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 9:12 PM
७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही व्यसनमुक्ती केंद्र, दारुबंदीचे लढे पुकारावे लागत आहे. त्यामुळे समाजात संस्काराचे बीज रुजविणे गरजेचे असल्याचे मत वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देसी.मो. झाडे फाऊंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा