आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपाचे सदस्यत्व आणि लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट आव्हान देण्याचे ठरविले आहे. जातीच्या मुद्द्यावरुन मोदी गुजरातमध्ये मते मागत आहेत. मात्र ‘ओबीसीं’च्या मुद्द्यावर आपण प्रश्न विचारला असता मोदी यांचा तिळपापड झाला होता. ते आपल्यावर भडकले होते. आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले.शुक्रवारी रात्री नागपुरात आल्यानंतर शनिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र, छत्तीसगडच्या खासदारांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची वागणूक ही योग्य नव्हती. शेतकरी, ओबीसी समाज यांच्याबद्दल प्रश्न विचारले असता मोदी माझ्यावर भडकले. आता त्याच ओबीसी समाजाचा आधार घेऊन ते मते मागत आहेत. बैठकीनंतर गडकरी यांनीही माझ्यासोबत बोलताना नाराजी व्यक्त केली होती, असा दावाही त्यांनी केला. या बैठकीत मोदींनी आणखीही काही खासदारांना दरडावले होते. त्यांची नावे उघड केली तर त्यांच्या ‘नोकऱ्या’जातील, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी नेहमीच दबावतंत्राचा वापर केला. ११ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये जाऊन मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे, ‘आगे आगे देखिये, होता है क्या’, असा इशाराही त्यांनी दिला.भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जायचे हे अद्याप निश्चित केलेले नाही. गुजरातमध्ये काँग्रेस भाजपाला टक्कर देत असल्यामुळे आपण तेथे काँग्रेसच्या प्रचारासाठी जात आहोत. राहुल गांधींशी चर्चाही करणार आहोत. मात्र, पुढील राजकीय वाटचालीबाबत जनमत घेऊनच निर्णय घेऊ. वाटले तर स्वत:चा पक्ष काढेल, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.
मुंडे असते तर वेगळे चित्र असतेगोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांच्यामुळे मी भाजपमध्ये आलो होतो. आज मुंडे असते तर त्यांनी अशी वेळच येऊ दिली नसती. त्यांनी काही ना काही मार्ग नक्कीच शोधून काढला असता, असे नाना पटोले म्हणाले. दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना मालेगाव प्रकरणाशी संबंधित काही माहिती द्यायची होती. मात्र त्यांची वेळच मिळू शकली नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.
वेगळ्या विदर्भावरही रोखले भाजपाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. याच आधारवर आपण संसदेत वेगळ्या विदर्भाचे विधेयक सादर केले. मात्र, त्यावेळीही आपल्याला मोदींची बोलणी खावी लागली. विधेयक संसदेत सादरच करू दिले नाही, असा आरोप पटोले यांनी केला. आता जनमताचा कौल घेऊन, विदर्भवादी नेत्यांच्या भेटी घेऊन विदर्भाच्या लढ्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.