हलगर्जी चव्हाट्यावर, अग्निरोधक यंत्रणा आरोग्य संचालनालयातच रखडली, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही कारवाईची घोषणा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/नागपूर- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शनिवारी पहाटेच्या आगीमागे शॉर्ट सर्किटचे कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात मानवी चुकामुळेच दहा तान्हुल्यांचा बळी गेल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. दोषी आरोग्य अधिकाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न चव्हाट्यावर आले असून त्याच कारणाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषित केलेल्या सहा सदस्यीय चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांना हटवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे ती जबाबदारी सोपविली.
भंडाऱ्याचा आकांत ऐकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी तातडीने येथे पोहचले. दहा बाळांचे बळी गेलेल्या जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. जवळच्या गावांमध्ये जाऊन शोकाकूल मातापित्यांचे सांत्वन केले. तथापि, या दौऱ्यात तरी संबंधितांवर कारवाईची घोषणा होईल, ही अपेक्षा फोल ठरली. दुर्लक्ष खपवून घेणारा नाही, कुणालाही दयामाया दाखविणार नाही, हेच शब्द पुन्हा ऐकवून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले.
भंडारा दुर्घटनेतील हलगर्जीची एक-एक बाब आता समोर येऊ लागली आहे. आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रकमेच्या अंदाजपत्रकाचा जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूरचे आरोग्य उपसंचालक व राज्याच्या आरोग्य संचालकांनी फुटबॉल बनविल्याचे उघडकीस आले असून. सिव्हील सर्जन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची मूळ अंदाजपत्रकावर स्वाक्षरी नसल्याच्या कारणाने त्याला मंजुरी मिळाली नाही. तो धूळखात पडून राहिला. या संदर्भातील अधिकृत पत्रच लोकमतच्या हाती लागले असून त्यानुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना १५ सप्टेंबर २०२० ला आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला. तो वेळीच मंजूर झाला असता तर निरपराध बालकांचे जीव वाचले असते. आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे त्यासाठी जबाबदार असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी त्यांनाच चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमले.
चौकट १
त्या परिचारिका कोण?
नवजात अर्भकांच्या अतिदक्षता कक्षात शुक्रवारी रात्री एकूण १७ अर्भकांवर उपचार सुरू होते व त्यांची जबाबदारी एकाच परिचारिकेकडे होती. त्यांनी कक्षाला बाहेरून कडी लावल्याचे अग्नितांडवात सापडलेल्या मातांनी शनिवारी सांगितले. या पार्श्वभूमीवर, त्या परिचारिका कोण हे शोधण्याचे काम कालपासून सर्वजण करताहेत. परंतु, आरोग्य यंत्रणा त्यांचे नाव समोर येऊ देत नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यामागे काही गंभीर कारण असावे. एरव्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी देणारे उच्चपदस्थ अधिकारी एका परिचारिकेला का संरक्षण देताहेत, हा प्रश्न लोकांना पडला आहे.
चौकट २
आरोग्य संचालकांची २४ तासात उचलबांगडी, विभागीय आयुक्त चौकशीचे प्रमुख
अग्नितांडवाच्या चाैकशीसाठी आराेग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरुन आराेग्य संचालक डॉ. साधना तायडे यांची अवघ्या २४ तासातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलबांगडी केली. फायर ऑडिट प्रकरणातील डॉ. तायडे यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार आता समितीचे अध्यक्ष असतील. डॉ. तायडे समितीच्या केवळ सदस्य असतील.
चौकट ३
पोलीस कारवाईला चाैकशी समितीचा कोलदांडा
दहा तान्हुल्यांना मृत्यूच्या जबड्यात ढकलणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईतून वाचविण्यासाठीच आरोग्य खात्यातील चौकशी समितीचा खेळ रचण्यात आल्याचा संशय प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एरव्ही, अशी घटना घडली की प्रथमदर्शनी दोषी असलेल्यांविरूद्ध पोलीस गुन्हे दाखल करतात. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेबाबत मात्र घाईघाईने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आल्याने पोलीस कारवाईला लगाम बसला. फौजदारी प्रकरणांच्या जाणकारांच्या मते आगीची घटना व बाळांचा मृत्यू या दोन स्वतंत्र घटना समजायला हव्यात. त्यांची सरमिसळदेखील केवळ वेळ मारून नेण्यासाठी केली असण्याची शक्यता आहे.
----------------------------------------