लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बंधन १ ऑगस्टपासून येणार आहे. त्यामुळे मिठाईत भेसळ वा निकृष्ट दर्जाची असल्याचा ग्राहकांकडून होणारा आरोप या निमित्ताने थांबणार आहे.केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार हा नियम १ ऑगस्टपासून देशात बंधनकारक होणार आहे. हा नियम १ जूनपासून लागू होणार होता, पण लॉकडाऊनचा कालावधी वेळोवेळी वाढल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद आहेत. त्यामुळे हा नियम १ ऑगस्टपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुरशीयुक्त वा निकृष्ट मिठाईच्या तक्रारींवर आता विराम बसणार आहे.मिठाई खाण्यास अयोग्य असल्याच्या तक्रारी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे येत आहेत. या तक्रारी मुख्यत्वे दिवाळी आणि अन्य सणांच्या काळात जास्त येतात. अशावेळी विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी नमुने घेऊन दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवितात. नमुन्याचा अहवाल प्राप्त होण्यास अनेक महिने लागतात. या प्रक्रियेपासून आता सुटकारा मिळणार आहे. खुल्या मिठाईची उत्पादन तारीख आणि कोणत्या तारखेपर्यंत खाण्यास योग्य आहे, ही बाब ग्राहकांना कळत नव्हती. खरेदीनंतर ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. पण आता खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख आणि या तारखेपर्यंत खाण्यास योग्य असल्याचा लेबल लावणे बंधनकारक केल्याने ग्राहकांनाही खरेदी सोपी झाली आहे.सणांदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही विक्रेते खाण्यास अयोग्य असलेली मिठाई विकतात, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख व वापराच्या अंतिम मुदतीच्या तारखेचा उल्लेख नसल्याने ग्राहकही ताज्या आणि खराब मिठाईची ओळख करू शकत नाही. निकृष्ट दर्जाच्या मिठाईच्या सेवनाने तब्येत बिघडणे, उलट्या, डोकेदुखीचा त्रास होतो.कायद्यात १ लाखापर्यंत दंडअन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत खुल्या मिठाईवर उत्पादन तारीख आणि सेवनासाठी या तारखेपूर्वी योग्य असल्याचे लेबल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संचालकांना लावणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना हायजेनिक मिठाई मिळेल. यामुळे विक्रेते व खरेदीदारांना फायदा होणार आहे. या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना १ लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.शरद कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.
आता खुल्या मिठाईवर उत्पादन तारखेचे लेबल लावणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 8:47 PM
मिठाई अथवा कोणत्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर उत्पादन तारीख आणि या तारखेपूर्वी खाण्यास योग्य (बेस्ट बिफोर) असे छापणे बंधनकारक आहे. पण आता हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तारीख आणि बेस्ट बिफोरचे लेबल लावण्याचे बंधन १ ऑगस्टपासून येणार आहे.
ठळक मुद्दे१ ऑगस्टपासून सक्ती : अन्न सुरक्षा व मानके कायदा