नागपूर : गजबजलेल्या आयटी पार्कजवळ गायत्रीनगर परिसरात शुक्रवारी सकाळी बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. हा बिबट्या अगदी घराच्या शेडमध्ये बसलेला होता, असे सांगण्यात येत आहे. शहराच्या वस्तीत अशा हिंस्त्र श्वापदाच्या दिसण्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीनगर निवासी नरेंद्र चकाेले यांच्या घरी पहिल्यांदा सकाळी १० वाजताच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. सकाळी झाडांना पाणी द्यायला आलो तेव्हा बिबट्या घराच्या मागच्या शेडखाली बसून असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर जवळच राहणाऱ्या किशाेर जगताप यांनाही ताे घराजवळ दिसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ताे अगदी लागून असलेल्या नॅशनल फायर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या आवारात शिरल्याचे लाेकांनी पाहिले. येथेच फायर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे क्वार्टर्स आहेत. नागरिकांनी वनविभागाला याबाबत सूचना दिली. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली व कुतुहलापाेटी लाेक गायत्रीनगर वस्तीकडे पाेहोचायला लागले. दरम्यान, माहिती मिळताच सेमिनरी हिल्स व हिंगणा रेंजचे आरएफओ रेस्क्यू टीमसह घटनास्थळी पाेहोचले. त्यांनी शाेधाशाेध सुरू केली असता चकाेले यांच्या घराच्या छतावर बिबट्याच्या पावलाचे ठसे त्यांना आढळून आले. यानंतर वनविभागाच्या पथकाने दिवसभर बिबट्याचा शाेध घेतला, पण ताे आढळून आला नाही. त्या मार्गाने अंबाझरी उद्यानाकडे गेल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. सध्या मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. नाशिक, पुणे व मुंबईच्या बाेरीवलीनंतर नागपुरातही बिबट्या धुमाकूळ घालताे की काय, अशी भीती नागरिकांमध्ये आहे.
अंबाझरी पार्कमधून येण्याची शक्यता
हा बिबट्या नेमका कुठून आला याबाबत वनविभागात खल सुरू आहे. अंबाझरी बाॅयाेडायर्व्हसिटी पार्कमध्ये बिबट्याचा वावर आहे आणि तिथूनच ताे आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कडक उन्हामुळे पाण्याच्या शाेधात किंवा श्वानांचा पाठलाग करीत ताे वस्तीत शिरल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. वनविभागाची टीम बिबट्याचा कसून शाेध घेत आहे.