लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड/काटाेल/कळमेश्वर/कामठी/सावनेर/रामटेक/माैदा/कुही/कन्हान/टाकळघाट : तब्बल १४ दिवसाची उसंत घेतल्यानंतर बुधवारी (दि. ७) जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही भागात मध्यरात्री तर काही ठिकाणी गुरुवारी (दि. ८) सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील रामटेक, भिवापूर, कामठी, माैदा तालुक्यात मुसळधार, उमरेड, सावनेर, कळमेश्वर, कुही, हिंगणा तालुक्यात संततधार, पारशिवनी, नरखेड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला तर काटाेल व नरखेड तालुक्यात पावसाची रिपरिप हाेती. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामाला लागले आहेत.
रामटेक, भिवापूर, कामठी तालुक्यासह मांढळ (ता. कुही), खात (ता. माैदा), नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील बाजारगाव, शिवा, सावंगा, सातनवरी, धामणा, व्याहाड, पेठ, डिगडोह, देवळी व गौराळा परिसरात गुरुवार सकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. उमरेड, कळमेश्वर, कुही, सावनेर तालुक्यासह धामणा (ता. नागपूर ग्रामीण), बडेगाव (ता. सावनेर), टाकळघाट (ता. हिंगणा) भागात संततधार पाऊस बरसला. माेवाड व सावरगाव (ता. नरखेड), कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात तसेच हिंगणा तालुक्याच्या काही भागात मध्यम स्वरुपाचा तर नरखेड, जलालखेडा व मेंढला (ता. नरखेड) परिसरात तसेच काटाेल तालुक्यात दिवसभर पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू हाेती. त्यातच बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी पावसाच्या दमदार सरी बरसल्याने शेतकरी थाेडे चिंतामुक्त झाले आहेत.
...
पिकांना जीवनदान
जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली. मध्यंतरी १४ ते १८ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने कपाशी, साेयाबीनसह अन्य पिके काेमेजल्यागत झाली हाेती. काहींनी तुषार सिंचनाच्या मदतीने पिके जगवली. काही काेरडवाहू शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागली. पाऊस जर आला नाही तर दुबार किंवा तिबार पेरणी करावी लागणार की काय, अशी चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत हाेती. याच काळात शेतकऱ्यांनी पिकांच्या डवरणीची कामेही हातावेगळी केली.
...
धानाच्या राेवणीला सुरुवात
कामठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या शेवटी पऱ्हे टाकले हाेते. ते लागवडी याेग्यही झाले हाेते. पावसाअभावी शेतकऱ्यांनी ओलित करून पऱ्हे जगवले. त्यासाठी नाग नदीच्या पाण्याचा वापर केल्याची माहिती केम येथील शेतकरी अतुल बाळबुधे यांनी दिली. मध्यंतरीच्या उघाडीनंतर बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसल्याने कामठी तालुक्यातील आडका, केम शिवारातील शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीला सुरुवात केली. चालू खरीप हंगामात तालुक्यात ७२६ हेक्टरमध्ये धानाच्या राेवणीचे नियाेजन कृषी विभागाने केले आहे....