लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणि जिल्ह्यातील सिंचनाच्या झालेल्या घटीमुळे एकूण १६ उपाययोजनांना शासनाने मे २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. सिंचनाची ही सर्व कामे त्वरित सुरु करावी या विषयावर सविस्तर चर्चा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली.याप्रसंगी मुख्यमंत्री बी. एस. स्वामी, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता तुरखेडे, रवींद्र बानाबाकोडे आदी उपस्थित होते.पावसाळ्यापूर्वी पाणीटंचाई आणि सिंचनाची स्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. तोतलाडोह, पेंच आणि तत्सम मोठ्या धरणांमधील पाणीसाठा संपला होता. नागपुरात एक दिवस आड पाणीपुरवठा सुरु झाला होता. ती स्थिती लक्षात घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने १०१५ कोटींच्या उपाययोजनांना मंजुरी दिली होती. ही कामे अजूनपर्यंत सुरु झालेली नाही. या योजनांतर्गत पोहरा नदीवर ५ मोठे बंधारे व पोहरा नदीचे पुनर्जीवन करणे, नाग नदीवर १३ बंधारे बांधणे, मौदा तालुक्यात पानमारा वरून एनटीपीसीसाठी पाणी घेण्याची गरज आहे. कोच्छी बॅरेज पूर्ण करणे आणि बंद पाईपलाईनमधील पाणी आणायचे आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाल्यामुळे जलशयांमध्ये चांगले पाणी उपलब्ध आहे. पण टंचाईसाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढावे म्हणून या उपाययोजना भाजपा शासनाने केल्या. १०१५ कोटींच्या उपाययोजनांना त्यावेळी तात्त्विक मान्यता देण्यात आली आहे.पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात प्रस्तावित सर्व उपसा सिंचन योजनेखालील १४०१० हेक्टर क्षेत्रावर वितरण प्रणाली सूक्ष्म सिंचनाखाली आणणे. बाबदेव साखर कारखान्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यावरून मौदा शाखा कालव्यात उपसा सिंचनासाठी पाणी वापरणे. यामुळे २१६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. १८ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. सांड नाल्यावर निमखेडा गावाजवळ चाचेर आणि बेलडोंगरीच्या खाली नवीन बंधारा बांधून तारसा वितरिका कालव्यात उपसा सिंचनाद्वारे पाणी वापरण्याची योजना आहे. सूर नदीवर अरोली गावाजवळ तसेच खंडाळा गावाजवळ नवीन बंधारा बांधून सी उपशाखा कालव्यात उपसाद्वारे सिंचनासाठी पाणी वापरणे. यामुळे २१०० हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. १५ दलघमी पाणी यामुळे उपलब्ध होणार आहे.
- सूर नदीवर भोसा-खमारी तसेच कोदामेंढी इंदोरा गावाजवळ नवीन बंधारा बांधून काटी जंक्शनवर कालव्यात उपसा सिंचनद्वारे पाणी वापरणे. यामुळे २८५० हेक्टर सिंचन वाढणार आहे.
- कन्हान नदीवरील माथनी येथील जुन्या पुलास ब्रिज कम बंधारा करून तेथून पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मौदा शाखा कालव्यात सोडून सिंचनासाठी वापरल्यास ३९०० हेक्टर सिंचन क्षमता वाढणार असून २६ दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे.
- कन्हान नदीतील पाणी पंच उजव्या कालव्यावर जलसेतू जवळ बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे पाणी सोडणे. सिहोरा येथे एल-४ शाखा कालव्याच्या किमी २जवळ कन्हान नदीवर बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे पाणी सोडणे. या योजनेमुळे अनुक्रमे ६ हजार आणि ३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. एकूण २४५ कोटींच्या ९ योजनांतून २३३३७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.