अभय लांजेवार
नागपूर : विद्युत रोषणाईच्या झगमगाटात डीजेच्या तालावर नृत्यांगना थिरकत होत्या. सोबतीला दारूच्या बाटल्या. हातात नोटा. नृत्यांगना थिरकत होत्या अन् हवेत पैशांचा पाऊस पडत होता. हे अश्लील दृश्य एखाद्या महानगरीच्या हायफ्रोफाईल डान्स बारमधील नाही. उमरेड, कऱ्हांडला, पवनी अभयारण्याला लागून असलेल्या एका रिसॉर्टमधील आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत या वाह्यात प्रकरणाचा भंडाफोड केला. मंगळवारी मध्यरात्री उमरेड (जि. नागपूर) तालुक्यातील तिरखुरा शिवारात असलेल्या रिसॉर्टवर रात्री चालणारा हा धांगडधिंगा एलसीबीने उजेडात आणला.
याप्रकरणी सहा नृत्यांगना आणि १२ पुरुष अशी १८ जणांवर कारवाई केली गेली. ललित नंदलाल बैस (५०), अभय रमेश भागवत (४९), डॉ. गोपाल सत्यनारायण व्यास (४८, तिघेही रा. खातरोड, भंडारा), पंकज तुलसीराम हाठीठेले (३६, समतानगर, जरीपटका नागपूर), मनीष ओमप्रकाश सराफ (४७, एमआयडीसी, वर्धा), समीर कमलाकर देशपांडे (५५, सुरेंद्रनगर, नागपूर), रजत विनोद कोलते (३२), केशव रवींद्र तरडे (३५, दोघेही रा. कोदामेंढी, ता. मौदा), मंगेश सुरेश हरडे (३८, नंदनवन, नागपूर), आशुतोष शेषराव सुखदेवे (२८, खामला, नागपूर), पारस ज्ञानेश्वर हाठीठेले (२६, नागपूर) आणि रिसॉर्टचा व्यवस्थापक अरुण अभय मुखर्जी (४७, मनीषनगर, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तपासणीअंती आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपींना सूचनापत्रावर सोडण्यात आले. या कारवाईमुळे उमरेडसह भंडारा, नागपूरसह मौदा परिसरात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची चमू या रिसॉर्टवर पोहोचली. अर्धा-एक तास या चमूने अश्लील डान्स नेमका कुठे आहे याची शोधाशोध केली. रिसॉर्टमधील एका शानदार बंद हॉलमध्ये हा डान्स धिंगाणा सुरू असल्याचा सुगावा लागला. गुन्हे शाखेच्या चमूने आत प्रवेश करीत रंगेहाथ आरोपींना ताब्यात घेतले.
विदेशी दारूसह रोकड जप्त
याठिकाणी अश्लील डान्सवर हवेत पैसे उडवून जोरदार डान्स हंगामा सुरू होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने डीजे (ध्वनी उपकरणे), स्मोक मशीन, स्टेबलायझर, साऊंड लेव्हल मशीन, एम्प्लिफायर, साऊंड मिक्सर, दोन लॅपटॉप, विदेशी दारू आणि नगदी रोकड १ लाख ३० हजार ३०० रुपये असा एकूण ३ लाख ७२ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उमरेड पोलिस ठाण्यात २९४, ३४ भा.दं.वि. सहकलम १३१ अ, ३३ अ, ११०, ११२, ११७ मपोका सहकलम ६५ ई मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत.