योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत कॉंग्रेसने भाजप संविधानविरोधी असल्याचा खोटा अपप्रचार केला. प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसनेच वारंवार संविधानाची हत्या केली. इतकेच नव्हे तर देशाला संविधान देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेसलाच कंटाळून मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. कॉंग्रेसने वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला होता, असा आरोप संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लावला. नागपुरात शुक्रवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने अपप्रचाराचे जाळे विणले व त्यात अनुसूचित जाती तसेच जमातीचे नागरिक अडकले. प्रत्यक्षात भाजपनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जपण्याचे मौलिक कार्य केले. कॉंग्रेसने त्यांना भारतरत्नदेखील मिळू दिले नव्हते. कॉंग्रेसचे सरकार गेल्यावरच त्यांना हा सन्मान मिळाला होता. ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला कधी मानले नाही तेच लोक आता संविधान हाती घेऊन राजकारण करीत आहेत, अशी टीका रिजिजू यांनी केली..
अपप्रचार सुरू राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन
काँग्रेसच्या भूलथापांना आमचा समाज बळी पडला. काँग्रेस पक्ष हाच संविधानाचा मारेकरी आहे. त्यांना मतदान केल्यास जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही. कॉंग्रेसकडून संविधानाचे नाव घेऊन अपप्रचार सुरूच राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा रिजिजू यांनी दिला.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले हा शापचयावेळी रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने कधीच संविधानाचा आदर केला नाही. त्यांना संविधानाची तत्वेदेखील समजत नाहीत. ते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले हा शापच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन रिजिजू यांनी केले.
प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन
केंद्र शासनाकडून राज्य शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे भवन सर्व जातीधर्मांसाठी खुले असेल. यात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, वाचनालय, क्रीडा सुविधा उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे, अशी माहिती रिजिजू यांनी दिली.
दीक्षाभूमीला दिली भेटदरम्यान, रिजिजू यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलींद माने, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, सुभाष पारधी, संदीप गवई प्रामुख्याने उपस्थित होते.