नागपूर : उत्तर गाेलार्धावरील देशांमध्ये यावर्षी थंडीचा प्रकाेप जास्त जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पश्चिम युराेप तसेच पूर्व आशियायी देशांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. ‘ला-निनाे इफेक्ट’चा प्रभाव भारतावरही पडणार आहे. उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता असून त्याचे परिणाम विदर्भ व महाराष्ट्रातही जाणवतील. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाेकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (It will be very cold this year; ‘La-Ninae’ effect)
भारतीय हवामान विभागानुसार मागीलवर्षीही ला-निनाे इफेक्टमुळे थंडी वाढली हाेती. पण त्याचा प्रभाव कमी हाेता. यावर्षीही ला-निनाेचा प्रभाव राहणार आणि परिस्थिती अधिक कडक राहणार असल्याचे विभागाने व्यक्त केले आहे. नाेव्हेंबर महिन्यात प्रभाव वाढून थंडी वाढायला सुरुवात हाेईल. त्यानंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात तापमानात विक्रमी घट हाेण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पॅसिफिक महासागराचे तापमान कमी हाेत असून थंडी वाढत आहे. त्यालाच ला-निनाेचा हा प्रभाव म्हणतात. विशेष म्हणजे नासाच्या ‘नाेआ’ तसेच ‘वेदर डाॅट काॅम’ या हवामान संस्थांनी उत्तर गाेलार्धात परिस्थिती बिकट हाेणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
कॅनडा, सायबेरिया तसेच पश्चिम युराेपातील देशांमध्ये अतिशय थंड हवेच्या लाटा तसेच बर्फाचे वादळ व बर्फवृष्टी हाेण्याची शक्यता आहे. त्याच्याच प्रभावातून पूर्व आशियायी देशांत थंड हवेच्या लाटा येतील. उत्तर भारतात थंड हवेच्या लहरी येतील आणि विदर्भासह महाराष्ट्रातही गारठा वाढेल, असा अंदाज आहे.
आतापर्यंत सर्वात कमी तापमान
नागपूर : ७ जानेवारी १९५७- ३.९ अंश, २०११- ५.६ अंश, २०१३-५.७, २०१६-५.१ अंश
चंद्रपूर : १०/१/१८९९- २.५ अंश, २/२/१९८५- ३.९ अंश, ११/१२/२०००- ३.५ अंश, २३/११/१९६८-६.२ अंश
ब्रम्हपुरी : ३ जानेवारी १९९१-०.८ अंश, १९९२-२.६ अंश,
अकाेला : ९ फेब्रुवारी १९८७ - २.२ अंश
वर्धा : २९ डिसेंबर २०१८ - ६.२ अंश
अमरावती : ९ फेब्रुवारी १९८७ - ५ अंश
यवतमाळ : १९ डिसेंबर २०१० - ६.२ अंश
ला-निनाे मुळे यावर्षी थंडीचा प्रकाेप अधिक जाणवणार आहे. शिवाय वाढते तापमान हे सुद्धा थंडीच्या लाटा येण्यास कारणीभूत ठरतात. उन्हाळ्यात तापमान जेवढे अधिक असेल तेवढे ते हिवाळ्यात घटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे भारतात थंडीचा प्रभाव मागील वर्षाच्या तुलनेत जास्त राहील. हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी वाढेल आणि उत्तर भारतात थंडीचा प्रकोप वाढेल. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात थंडी आणि थंडीच्या लहरी येतील.
- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक